"अखिलेशजी जात कशी काय विचारली?", जुना व्हिडीओ शेअर करत अनुराग ठाकूर यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:29 PM2024-07-31T16:29:59+5:302024-07-31T16:55:39+5:30
Anurag Thakur Vs Akhilesh Yadav: भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारल्याने सुरू झालेल्या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आता अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्याच व्हिडीओंच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जातिनिहाय जनगणनेवरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षातील काँग्रेस आमने-सामने आले आहेत. अर्थसंकल्पावर भाषण करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्यावर निशाणाी साधला होता. त्यानंतर या वादात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही उडी घेत सभागृहात कुणाची जात कशी विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारला होता. त्याला आता अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्याच व्हिडीओंच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दिखावूपणा आणि सत्य असा उल्लेख करत अखिलेश यादव यांचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील एका बाजूला अखिलेश यादव यांनी नुकत्याच केलेल्या विधानाची चित्रफित आहे. तर दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांनी काही पत्रकारांशी साधलेल्या संवादाची चित्रफित आहे.
जाति कैसे पूछ ली अखिलेश जी ? pic.twitter.com/uaFujlDWrD
— Anurag Thakur (@ianuragthakur) July 31, 2024
दरम्यान, अनुराग ठाकूर यांचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनुराग ठाकूर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओच्या पहिल्या भागात अखिलेश यादव हे लोकसभेमध्ये एखाद्याची जात कशी काय विचारली जाऊ शकते? असा सवाल आक्रमकपणे विचारत आहेत. तर दुसऱ्या भागात हेच अखिलेश यादव हे काही पत्रकारांना जात विचारताना दिसत आहेत. ‘तुम्ही तुमचा कॅमेरा दुसरीकडे घेऊन जा. तुम्ही मागास आहात की आणखी कोण? नाव काय आहे तुमचं? यांचं नाव काय आहे, असे मिश्राजी, कुछ तो शर्म करो, पत्रकारिता करो यार, असं म्हणताना दिसत आहेत. तर याच व्हिडीओमध्ये अखिलेश यादव यांची आणखी एक चित्रफित असून, त्यामध्ये ते आणखी एका पत्रकाराचं नाव विचारताना दिसत आहेत. अरे, नाव काय आहे यांचं? संपूर्ण नाव सांगा, अरे हे तर शुद्र नाहीत, असं बोलून हसताना दिसत आहेत.