कसे उघडले ‘दक्षिणेचे दार’? भारत जाेडाे यात्रा ठरली टर्निंग पाॅइंट...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 06:39 AM2023-05-14T06:39:42+5:302023-05-14T06:44:04+5:30
रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती.
आदेश रावल -
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार विजय मिळाला आहे. प्रचाराची सारी सूत्रे काँग्रेसच्या ‘वॉररूम’मधून निवडणूक रणनीतीकार सुनील कानूगोलू आणि पक्षाचे महासचिव तसेच कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला हलवित होते.
रणदीप सुरजेवाला यांनी आपले विश्वासू प्रोफेसर गौरव वल्लभ यांच्याकडे मीडियातील प्रचाराची रणनीती ठरवण्याचे काम सोपविले होते. यातूनच ४० टक्के कमिशन, पाच आश्वासने, नंदिनी दूध तसेच महागाई आदी स्थानिक मुद्द्यांना केंद्रस्थानी धरून प्रचाराची रणनीती आखली होती. निवडणूक प्रचारात उद्योगपती गौतम अदानी आणि चीनसारख्या राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेखही करायचा नाही, यासाठी राहुल गांधी यांना राजी करण्यात आले होते.
काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदीचे आश्वासन दिले होते. काँग्रेसकडून ही मोठी चूक झाली, असे मानले जात होते. परंतु हा काँग्रेसच्या रणनीतीचा एक भाग होता. दलित समाजाची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने जाणीवपूर्वक ही खेळी केली होती. कर्नाटकमध्ये अनेक दलित युवकांची हत्या केल्याचा आरोप बजरंग दलाच्या नेत्यांवर होता. यामुळे दलित समाजात या संघटनेविषयी कमालीचा राग होता.
स्ट्राइक रेट ६६% -
मतदारांना भावली भारत जोडो यात्रा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये २१ दिवस होती. तिचा प्रवास झालेल्या सात जिल्ह्यांमध्ये ४८ विधानसभा जागा आहेत. त्यातील ३२ जागा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने जिंकल्या. म्हणजे काँग्रेसचा तेथील स्ट्राइक रेट ६६ टक्के आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकांत या सात जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने फक्त १५ तर भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. पण, यंदा काँग्रेसने हे सर्व जिल्हे काबीज केले आहेत.
५११ किलाेमीटरचा प्रवास २१ दिवसांमध्ये
देशात सध्या लोकांमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सुरु आहे, समाजामध्ये फूट पा़डली जात आहे. पण, मी जनतेमध्ये प्रेम वाटण्यासाठी आलो आहे, असा संदेश राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान दिला होता. यामुळे प्रभावित झालेल्या लोकांनाही २१ दिवसांत या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला होता.
काँग्रेसचे अभिनंदन -
काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकांत विजय मिळाला. त्याबद्दल त्या पक्षाचे मन:पूर्वक अभिनंदन. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस करणार असलेल्या प्रयत्नांकरिता मी शुभेच्छा देतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान