राहुल गांधींच्या समर्थनार्थ शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले, आंदोलनात मात्र चाळीसच उरले, बाकीचे खाऊन-पिऊन घरी पळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:41 PM2022-06-15T17:41:39+5:302022-06-15T17:42:13+5:30
Congress Protest: राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र आंदोलनासाठी केवळ ४० कार्यकर्ते पोहोचले. उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेऊन-खाऊन पसार झाले.
जयपूर - राजस्थानमधील उदयपूर येथे शहर जिल्हा कमिटीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमले होते. सुमारे दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांनी कार्यशाळेत भोजन केले. त्यानंतर ते सर्वजण राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. मात्र आंदोलनासाठी केवळ ४० कार्यकर्ते पोहोचले. उर्वरित कार्यकर्ते आणि पदाधिकारी जेऊन-खाऊन पसार झाले.
तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण काँग्रेस कमिटीच्यावतीने नवसंकल्प घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठी चर्चा करण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी ३५० हून अधिक कार्यकर्ते पोहोचले होते. तिथेही त्यांनी भोजनावर ताव मारला. त्यानंतर या सर्वांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन नियोजित होते. मात्र आदल्या दिवशी लंच नंतर बेपत्ता झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांप्रमाणे हे कार्यकर्तेसुद्धा गायब झाले. त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. एकूण ३५० कार्यकर्त्यांपैकी केवळ १०० कार्यकर्तेच कलेक्टर कचेरीसमोर पोहोचले.
गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची चौकशी ईडीकडून केली जात आहेत. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे दिसत आहे. मात्र उदयपूरमधील काँग्रेसचं आंदोलन चर्चेचा विषय ठरलं आहे. राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून आंदोलन नियोजित असताना त्यातील मोजके कार्यकर्ते वगळता इतरांनी घरची वाट धरल्याने या आंदोलनाचा फज्जा उडाल्याची चर्चा होत आहे.