माझं लग्न झालंय; राहुल गांधींचा अवाक् करणारा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:34 PM2018-08-14T17:34:50+5:302018-08-14T18:23:43+5:30
राहुल यांच्या विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या
हैदराबाद: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना अनेकदा त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. राहुल गांधी दोन दिवसांसाठी हैदराबादमध्ये असतानाही हा प्रश्न काही त्यांची पाठ सोडताना दिसत नाही. स्थानिक संपादकांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना त्यांना त्यांच्या लग्नाविषयी विचारलं. यावर बोलताना माझं लग्न झालंय, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थित संपादकांच्या भुवया उंचावल्या. मात्र दुसऱ्याच क्षणी मी काँग्रेस पक्षासोबत लग्न केल्याचं ते म्हणाले. हे ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
2019 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं भाकीत राहुल गांधी यांनी वर्तवलं. 'आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 230 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,' असं राहुल म्हणाले. काँग्रेससह भाजपाची विचारसरणी मान्य नसलेले पक्ष बहुमताच्या जवळ जात असल्यास कोण पंतप्रधान होईल, असा प्रश्न यावेळी संपादकांनी राहुल यांना विचारला. या प्रश्नाला राहुल यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 'या प्रश्नावर आम्ही काम करु. राज्य स्तरावरील काँग्रेस नेतृत्त्वाला समान विचारसरणी असलेल्या पक्षाशी आघाडी करण्याचं स्वातंत्र्य आहे,' असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
तेलंगणात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा विश्वास राहुल गांधी यांनी संपादकांशी संवाद साधताना व्यक्त केला. आंध्र प्रदेशात पक्षाची स्थिती सुधारत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं म्हणत राहुल यांनी असहिष्णूतेचा मुद्दा उपस्थित केला. मोदींच्या राजवटीत ना शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या, ना तरुणांना रोजगार मिळाला, अशा शब्दांमध्ये राहुल त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.