मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, राहुल गांधी यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 03:48 PM2019-07-03T15:48:49+5:302019-07-03T15:58:12+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे. पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नव्या अध्यक्षाची निवड काँग्रेसची कार्यकारी समिती करेल, असेही त्यांनी सांगितले.
बुधवारी प्रसारमाध्यमांनी संवाद साधताना राहुल गांधी यांनी आपल्या राजीनाम्याविषयी भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर आता मी नाही. आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय पक्षाची कार्यकारी समिती घेईल. तसेच पक्षाने अध्यक्षपदासाठी विनाविलंब निवडणूक घेऊन नव्या अध्यक्षाची निवड केली पाहिजे. आधीच राजीनामा दिलेला असल्याने मी या प्रकियेमध्ये सहभागी नसेन.''असे राहुल गांधी यांनी सांगितले.
I am no longer Congress president, affirms Rahul Gandhi
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2019
Read @ANI story | https://t.co/fHGRP1jT44pic.twitter.com/uliD7MXtIJ
दरम्यान, राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने या पराभवाचे उत्तरदायित्व स्वीकारून मी राजीनामा देत आहे,'''असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi: As president of the Congress party, I'm responsible for the loss of the 2019 elections, accountability is critical for the future growth of our party. It is for this reason that I have resigned as Congress president. pic.twitter.com/igokkZpMLs
— ANI (@ANI) July 3, 2019
मे महिन्यात आटोपलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले होते. या पराभवामुले व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच काँग्रेसचा यापुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र राहुल गांधी यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. मात्र आज त्यांनी ज्याप्रकारे आपण काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे सांगितले त्यावरून ते आपला निर्णय बदलणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सुमारे 40 मिनिटे चर्चा केली होती. तसेच सोमवारी काँग्रेसच्या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांना अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती केली होती. मात्र राहुल गांधी यांनी या मुख्यमंत्र्यांची मागणी धुडकावून लावत पक्षासाठी नवा अध्यक्ष शोधण्यास सांगितले होते.