"मी असं काहीच बोललो नाही..."; 'वारसा कर' वादावरून PM मोदींच्या टीके नंतर, राहुल गांधींचा पलटवार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:34 PM2024-04-24T17:34:22+5:302024-04-24T17:36:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या अमेरिकेतील वारसा टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशा....
वारसा कराच्या (Inheritance tax ) मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारसा कायदा ही काँग्रेसची मानसिकता असल्याचे म्हटल्यानंतर आता राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी ज्या वक्तव्यासंदर्भात बोलत आहेत, तसे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथील पक्षाच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही कारवाई करू, असे मी अद्यापपर्यंत म्हटलेले नाही. तर मी केवळ एवढेच म्हणत आहे की, या जाणून घेऊयात किती अन्याय झाला. यावेळी राहुल गांधी यांनी I.N.D.I.A. समूहाचा विजय झाल्यास राष्ट्रीय जात सर्वेक्षण करण्यासंदर्भआतील योजनेचाही उल्लेख केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, या अभ्यासामध्ये आर्थिक आणि संस्थात्मक अहवालाचा समावेश असेल. गेल्या काही वर्षांत समाजातील विविध घटकांचा विकास कसा झाला आणि सर्व गटांसाठी सामाजिक-आर्थिक न्याय आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी काय आवश्यक आहे? हे जाणण्यासाठी याची अत्यंत मदत मिळाले.
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काय म्हणाले होते पंतप्रधान -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या अमेरिकेतील वारसा टॅक्स संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला होता. छत्तीसगडमध्ये बोलताना ते म्हणाले होते, "राजघराण्यातील राजकुमाराच्या सल्लागाराने काही वेळापूर्वी मध्यमवर्गीयांवर अधिक कर लादले जावेत, असे म्हटले होतं. आता हे लोक एक पाऊल पुढे गेले आहेत. आता वारसा कर लावण्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पालकांकडून मिळालेल्या वडिलोपार्जित मालमत्तेवर ‘वारसा कर’ लावणार आहेत."
"जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावेल आणि जेव्हा तुम्ही जिवंत नसाल, तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा पडेल. म्हणजेच काँग्रेसची लूट जिंदगी के साथ भी, बाद भी... ज्या लोकांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला आपली वडिलोपार्जित मालमत्ता मानून ती आपल्या मुलांना दिली, त्यांना भारतीयांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना द्यावी, असे वाटत नाही."