'मी रस्त्यावर चहा पीत होतो, पोलिसांनी मला जबरदस्ती उचलले', रडत-रडत व्यक्तीने ऐकवली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:06 PM2022-06-14T13:06:24+5:302022-06-14T13:06:36+5:30
Congress protest against ED: राहुल गांधींची EDकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर निदर्शने करत आहेत. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला जबरदस्ती उचलल्याचा दावा केला जात आहे.
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ed) चौकशीला सामोरे जात आहेत. सोमवारनंतर आजही ईडीचे अधिकारी राहुल गांधींची चौकशी करत आहेत. तपास यंत्रणेची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. यादरम्यान पोलिसांच्या गाडीत एक व्यक्ती रडताना दिसला.
राहुल गांधी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी दिल्लीतील अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते. परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. अकबर रोडच्या आजूबाजूच्या अनेक रस्त्यांवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्याकडून राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा सुरू होत्या. यावळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले.
'माझा निदर्शनाशी संबंध नाही'
यावेळी मानसिंग रोडवर पोलिसांच्या गाडीत एक व्यक्ती रडताना दिसला. हा माणूस रडत रडत म्हणाला, "मी एक सामान्य नोकरी करणारा व्यक्ती आहे. मी एका कंपनीत मार्केटिंगची नोकरी करतो. मी इथे चहा पीत होतो आणि पोलिसांनी मला उचलले. कॅमेऱ्यावर रडत रडत या व्यक्तीने सांगितले की, माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही." त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून कारमध्ये बसलेल्या काँग्रेस नेत्याने पोलिसांवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांची चौकशी सुरू
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राप्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ईडीने समन्स बजावले आहे, मात्र त्या सध्या रुग्णालयात आहेत, त्यामुळे त्यांची नंतर चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र ईडीच्या या कारवाईला काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्लीपासून जयपूरपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.