राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास पत्नीला पोटगी देईल, पतीचा कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:43 AM2019-03-31T05:43:19+5:302019-03-31T05:43:59+5:30
शर्मा यांची घटस्फोटाची केस कुटुंब न्यायालयात सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाने पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून महिना 4500 रुपये देण्याचे आदेश आनंद यांना दिले
इंदौर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारातील 72 हजार रुपयांच्या 'न्याय स्कीम'च्या घोषणेनंतर इंदूरमधील एका व्यक्तीनं कौटुंबिक न्यायालयामध्ये अजब दावा केला आहे. टीव्ही कलाकार आनंद शर्मा (38) असे या पतीचे नाव असून पत्नीला पोटगी देण्यासंदर्भात त्यांनी हा अजब दावा केला आहे. शर्मा यांच्या उत्तराने न्यायालयातील अधिकारीही अवाक झाले आहेत.
शर्मा यांची घटस्फोटाची केस कुटुंब न्यायालयात सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाने पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून महिना 4500 रुपये देण्याचे आदेश आनंद यांना दिले. त्यावर आपली बाजू मांडताना आनंद शर्मा यांनी आपण बेरोजगार असल्याचा दावा केला. 'मी बेरोजगार आहे. कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार मी महिना 4500 रूपये देण्यास असमर्थ आहे. मी एक संघर्षकर्ता टीव्ही कलाकार आहे. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे सरकार येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी आनंद शर्मा यांनी न्यायालयाकडे केली आहे. जर केंद्रात काँग्रेसचे सरकार बनले, तर माझ्या बँक खात्यात 72 हजार रुपये जमी होतील. त्यानंतर, मी महिना 4500 रुपये आपल्या पत्नी आणि मुलीला देण्यास समर्थ असेल, असे शर्मा यांनी म्हटले आहे. शर्मा यांच्या या उत्तराने सर्वचजण अवाक झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.