विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं, २०२४ ला देशात INDIA विरुद्ध NDA सामना!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 03:37 PM2023-07-18T15:37:13+5:302023-07-18T15:37:21+5:30
INDIA VS NDA : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे.
Opposition Meeting । बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असून INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी माडला असून त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक करत सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
3बंगळुरू येथे सुरू असणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत,या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव @RahulGandhi यांनी मांडला.त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक.सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2023
I - Indian
N -…
विरोधी आघाडीच्या INDIA चा अर्थ काय?
- I - भारतीय (Indian)
- N - राष्ट्रीय (National)
- D - विकासात्मक (Developmental)
- I - सर्वसमावेशक (Inclusive)
- A - आघाडी (Alliance)
विरोधकांचा सरकारवर निशाणा
बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले, "ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. आज झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो." दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना 'सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू' असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे यांनी सांगितले. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले.