उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार ‘अँटी इन्कम्बन्सी’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:15 PM2022-02-09T13:15:48+5:302022-02-09T13:16:11+5:30
विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही.
रवी टाले -
डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर, तर सत्तेची स्वप्ने बघत असलेल्या काँग्रेसची ‘अँटी इन्कम्बन्सी’वर असल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. राज्याने उण्यापुऱ्या दोन दशकांत तब्बल दहा मुख्यमंत्री बघितले. गत निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत लाभूनही पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री नशिबी आले.
२०१७ मध्ये दिसली तशी मोदींची लाट यावेळी दिसत नसली तरी, त्यांचा जादुई करिश्मा कायम आहे आणि त्या बळावर यावेळीही तरून जाऊ, अशी भाजपची अपेक्षा आहे. राज्यात एकूण १३ जिल्ह्यांत ७० विधानसभा मतदारसंघ असले, तरी त्यापैकी तब्बल ३० डेहराडून, हरिद्वार आणि उधमसिंगनगर या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याला सीमा लागून असलेल्या उधमसिंगनगर जिल्ह्यात शीख शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.