उत्तराखंडमध्ये काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष, पक्षाचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 08:45 AM2022-04-13T08:45:15+5:302022-04-13T08:45:58+5:30
Congress Politics News: काँग्रेसला सत्तेच येण्याची उत्तम संधी असलेल्या उत्तराखंडमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता राज्यात प्रचंड अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.
देहराडून - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसला सत्तेच येण्याची उत्तम संधी असलेल्या उत्तराखंडमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता राज्यात प्रचंड अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. रविवारी काँग्रेसच्या हायकमांडने प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि उपविरोधी पक्षनेता पदांसाठी नावांची घोषणा केली. ऐन निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये आलेले यशपाल आर्य यांना विरोधी पक्षनेता बनवण्यात आले. तर रानीखेत येथून निवडणूक हरलेले करण माहरा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. या फेरबदलांमुळे काँग्रेसमध्ये अनेक बडे नेते नाराज झाले आहेत.
आता यामधील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात गेले आहेत. तसेच भाजपा या आमदारांना पक्षात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात २०१६ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्यातरी काँग्रेसचे आठ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ते लवकरच भाजपाच्या संपर्कात येऊ शकतात. यामधील ५ आमदार कुमाऊं आणि ३ गढवाल येथील असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यशपाल आर्य यांना विरोधी पक्षनेता आणि करण माहरा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आल्याने अनेकजण नाराज आहेत. ही नाराजी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीचे कारण ठरू शकते.
आता काँग्रेसचे १० आमदार आज देहराडूनमध्ये गोपनीय बैठक आयोजित करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये आमदार हरीश धामी, मनोज तिवारी, मदन बिस्ट, मयूर महर, खुशाल सिंह अधिकारी, ममता राकेश, विक्रम नेगी, राजेंद्र भंडारी सहभागी होऊ शकतात. काँग्रेसकडून उपेक्षा होत असलेल्याने नाराजी असलेले काही आमदार लवकरच काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल होऊ शकतात.