पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधये 47, केरळमध्ये 27 तर नेपाळमध्ये 21 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:35 AM2021-10-20T11:35:32+5:302021-10-20T11:41:28+5:30
आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार माजलाय. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे झालेल्या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला. बहुतेक मृत्यू ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झाले आहेत. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. तर, तिकडे केरळमध्येही विविध घटनांमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 27 जणांचा मृत्यू
केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राज्यात 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% अधिक पाऊस झाला आहे. साधारणपणे, या काळात 192.7 मिमी पाऊस पडतो, परंतु यावर्षी 453.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
केरळच्या 11 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट
आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाने आज तिरुअनंतपुरम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूरसह राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कासारगोड, अलप्पुझा आणि कोल्लममध्ये पिवळा इशारा सुरू आहे. 21 ऑक्टोबर रोजी कन्नूर आणि कासारगोड वगळता सर्व जिल्ह्यांसाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी
उत्तराखंड आणि नेपाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. लखीमपूर खेरी, सीतापूर आणि बाराबंकीमध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. वास्तविक, उत्तराखंडमधून बनबसा बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कोसी नदीने रामपूर परिसरात कहर सुरू केला आहे. नदीलगतच्या डझनभर गावांना पुराचा धोका आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
नेपाळमध्येही पावसामुळे 21 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसाचा फटका नेपाळलाही बसला आहे. पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील 19 जिल्हे पूर आणि भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले आहेत. देशात मान्सून हंगाम आधीच संपला होता, परंतु हवामानात अचानक बदल झाला आहे.