सध्याच्या परिस्थितीनुसार निवडणुका झाल्यास भाजपाला बसणार 100हून अधिक जागांवर फटका - सर्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:31 AM2018-08-21T08:31:27+5:302018-08-21T09:22:02+5:30
देशभरात जर आजच्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा पूर्णतः बहुमत मिळणार नाही...
नवी दिल्ली - देशभरात जर आजच्या परिस्थितीत लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला पूर्णतः बहुमत मिळणार नाही, असा दावा इंडिया टुडे-कार्वी इनसाइट्सने ‘मूड ऑफ द नेशन’नं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्वेनुसार आजही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदासाठीचे सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार आहेत. सर्वेमध्ये सहभागी झालेल्या 49 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर 27 टक्के लोकांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पसंती दर्शवली आहे.
सर्वेनुसार, काँग्रेस आणि यूपीएची केवळ मतदान टक्केवारी नाही तर लोकसभा 2014च्या तुलनेत जागाही वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे, भाजपाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा 2014 च्या निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएनं 320 हून अधिक जागा जिंकत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमतातील सरकार स्थापन केले होतं. लोकसभा 2019ची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्वेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तीन शक्यतांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
1. जर यूपीए आणि एनडीए 2014तील घटकपक्षांसोबतच निवडणूक लढवत असल्यास...
जर 2014 प्रमाणे राजकीय परिस्थिती असेल तर एनडीएला 281 जागा, यूपीएला 122 जागा आणि इतरांना 140 जागा मिळू शकतात. मतदान टक्केवारीबाबत बोलायचे झाल्यास एनडीएला 36 टक्के, यूपीएला 31 टक्के आणि इतरांना 33 टक्के मतं मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2014 मध्ये सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेस यूपीएमध्ये सहभागी नव्हते. 2014 मध्ये 23 पक्षांच्या एनडीए युतीला 336 जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या भाजपाला 282 जागांवर दणदणीत विजय मिळला होता. काँग्रेसला केवळ 44 जागा, तर 12 पक्षांच्या यूपीए आघाडीला 60 जागांवर विजय मिळाला होता. साडेचार वर्षांनंतर यूपीए आघाडीला दुप्पटीने जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर एनडीएला 55 जागांवर नुकसान होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2. जर यूपीएमध्ये सपा, बसपा आणि तृणमूल सहभागी होत असल्यास...
जर काँग्रेसप्रणित यूपीएने सपा, बसपा आणि तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास एनडीएची मतदान टक्केवारी कमी होणार नाही. मात्र जागा कमी होऊन 228 वर येऊ शकते. म्हणजे एनडीएला 100हून अधिक जागांवर नुकसान होऊ शकते. तर यूपीएच्या जागा वाढून 224 होऊ शकतात. तर इतरांना 91 जागा मिळतील. दूसरी परिस्थितीत यूपीएला जवळपास 41 टक्के, एनडीएला 36 टक्के आणि अन्य पक्षांना जवळपास 23 टक्के मतं मिळतील.
3. एनडीएनं दक्षिण भारतात एआयएडीएमके आणि वायएसआर काँग्रेससोबत युती केल्यास...
सर्वेनुसार, जर एनडीएने तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष अण्णाद्रमूक आणि आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि काँग्रेसने टीडीपी आणि जम्मू काश्मीरमधील पीडीपीला सोबत घेतले. तर एनडीएच्या जागांचा आकडा 255 पर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत यूपीएला 242 जागा मिळून त्यांना 43 टक्के मतं मिळू शकतात. इतरांना 46 जागा मिळू शकतात. जर टीआरएस आणि बीजेडी बीजेपीसोबत निवडणुकीनंतर एकत्र येत असल्यास एनडीएच्या एकूण 282 जागा होतील.