जनतेचा फायदा करण्याऐवजी मोदींनी तेलावरील अबकारी करात केली वाढ -राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 04:43 AM2020-03-16T04:43:06+5:302020-03-16T04:43:39+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढकेली.
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर इंधन तेलाच्या किमती घसरल्याचा जनतेला फायदा मिळवून द्या, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, त्याऐवजी मोदींनी इंधन तेलाच्या अबकारी करात वाढ केली, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे.
अबकारी करात वाढ केल्याने केंद्र सरकारला अतिरिक्त ३९,००० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झाल्याने त्याचेच अनुकरण केंद्र सरकारने देशातही करावे, अशी मागणी मोदी यांच्याकडे केली होती. मात्र, किमती कमी करण्याऐवजी मोदी यांनी इंधन तेलावरही अबकारी करात वाढ
केली.
मोदींचे लक्ष सरकार अस्थिर करण्याकडे
तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा केंद्र सरकारने जनतेला का मिळवून दिला नाही, या प्रश्नावर उत्तर देणे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकार परिषदेत टाळले होते. त्याची व्हिडिओ फीतही राहुल गांधी यांनी आपल्या टष्ट्वीटबरोबर झळकवली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी घसरल्या आहेत, याची नोंद घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष मध्यप्रदेशमधील लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्याकडे लागले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी केला होता. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात गेले असल्याने तेथील राज्य विधानसभेत तातडीने बहुमताची चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी भाजपने शनिवारी केली होती.
पेट्रोल १२, तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने सरकारी तेल विपणन कंपन्यांनी रविवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर बारा, तर डिझेल्या दरात १४ पैशांनी कपात केली आहे. या दर कपातीमुळे दिल्लीत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ६९ रुपये ७५ पैसे, डिझेलचा भाव ६२ रुपये ४४ पैसे झाला आहे. शनिवारी इंधनावर उत्पादन शुल्कात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती; अन्यथा ही दरकपात मोठी असती. उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याने किरकोळ दर कमी ठेवला जात आहे.
होणारा लाभ दरवृद्धीशी समायोजित करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क वाढविल्याने असे करणे जरूरी आहे, असे तेल विपणन कंपन्यांनी म्हटले आहे.
इंधनावरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्यात आल्याने त्यातून सरकारला ३९ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल.
केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवरील विशेष उत्पादन शुल्क प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून ८ रुपये करण्यात आले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर दोन रुपयांवरून ४ रुपये करण्यात आले. रस्ता उपकरही प्रतिलिटर एक रुपयाने वाढवून प्रतिलिटर दहा रुपये करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व उपकरासह पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क प्रतिलिटर २२ रुपये ९८ पैसे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर १८ रुपये ८३ रुपये झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार आले तेव्हा पेट्रोलवरील कर प्रतिलिटर ९ रुपये ४८ पैसे, तर डिझेलवरील कर प्रतिलिटर ३ रुपये ५६ रुपये होते.