कर्नाटकात मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री ठरले; उद्या शपथविधी, तयारीला लागण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 01:21 PM2023-05-17T13:21:10+5:302023-05-17T13:33:53+5:30
सिद्धरामय्या यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली.
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. मात्र याचदरम्यान सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रिपद आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, उद्या सिद्धारमय्या यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. कांतीरवा स्टेडियमवर होणाऱ्या शपथविधीसाठी अधिकाऱ्यांना तयारी करण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धरामय्या यांनी २०१३ ते २०१८पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सिद्धरामय्या यांनी आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली.
#WATCH | Delhi: Congress leader Siddaramaiah arrives at 10, Janpath to meet party leader Rahul Gandhi as the suspense continues over Karnataka CM post pic.twitter.com/CWmTmDctHu
— ANI (@ANI) May 17, 2023
सिद्धरामय्या कर्नाटकातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत. सुरुवातीपासूनच ते मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार यांच्यापेक्षा प्रबळ दावेदार मानले जात होते. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत १२ निवडणुका लढवल्या, त्यापैकी ९ जिंकल्या आहेत. जनता दल सरकारमध्ये ते १९९४ मध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. त्याची प्रशासकीय पकड मानली जाते. त्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही खटला नाही. डीके शिवकुमार यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत. ते तुरुंगातही गेला आहे.
सिद्धरामय्या कुरुबा समाजातून (ओबीसी) येतात. हा कर्नाटकातील तिसरा मोठा समुदाय आहे. एवढेच नाही तर सिद्धरामय्या हे राज्यातील सर्वात मोठे ओबीसी नेते मानले जातात. सिद्धरामय्या हे शिवकुमार यांच्यापेक्षा मोठे जननेते मानले जातात. सिद्धरामय्या आणि डीके हे दोघेही गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. मल्लिकार्जुन खर्गे यांनी २००८मध्ये सिद्धरामय्या यांना जेडीएसमधून काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत ते खरगे यांच्या अगदी जवळचे असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्रीपदाचे तिसरे दावेदार
दरम्यान, या दोघांशिवाय कर्नाटकातील ज्येष्ठ काँग्रेस नेते जी परमेश्वरा यांनीही स्वतःला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या हायकमांडने सरकार चालवण्यास सांगितले तर ते जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे परमेश्वरांनी मंगळवारी सांगितले. त्यांच्या पक्षसेवेची हायकमांडला जाणीव असल्याने त्यांना या पदासाठी लॉबिंग करण्याची गरज वाटत नाही, असेही ते म्हणाले.