राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:06 PM2021-03-03T16:06:46+5:302021-03-03T16:10:12+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मत प्रदर्शित करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) समजून घ्यायला राहुल गांधींना बराच वेळ लागेल, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे. या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मत प्रदर्शित करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) समजून घ्यायला राहुल गांधींना बराच वेळ लागेल, असे म्हटले आहे. (it will take long time for rahul gandhi to understand rss says union minister prakash javadekar)
गुजरातमध्ये झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रकाश जावडेकर यांनी आपले मत व्यक्त केले. लोकांचा भाजपवरील विश्वास वाढत चालला आहे. गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालावरून ते अधिकच स्पष्ट होते. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
गुजरात निवडणुकीत अपक्ष उमेदवारांपेक्षा कमी जागा!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा
राहुल गांधींना RSS बाबत काहीच माहिती नाही
प्रकाश जावडेकर यांना राहुल गांधी यांनी आणीबाणी प्रकरणी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राहुल गांधींना रा.स्व.संघ समजून घ्यायला बराच वेळ लागेल. रा.स्व.संघ ही जागतिक स्तरावरील सर्वांत मोठी संघटना आहे. मानवता आणि सामाजिक नैतिकता या संघटनेत शिकवली जाते. राहुल गांधी या गोष्टी कधीच समजू शकणार नाहीत, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी यावेळी लगावला. तसेच राहुल गांधी यांना संघाबाबत काहीच माहिती नाही. आणीबाणीवर अधिक भाष्य करू इच्छित नाही. त्यावेळी अनेक मंत्री, खासदार, आमदारांना कारागृहात डांबण्यात आले होते. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. काय काय झाले नाही त्या कालावधी, असेही जावडेकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कृषी कायदा मान्य
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने मतदारांनी दिलेला कौल हा अनेक गोष्टी नमूद करणारा आहे. भाजपच्या मोठ्या विजयाचा दुसरा अर्थ म्हणजे शेतकरी भाजपसोबत आहेत. कृषी सुधारणांना त्यांचा पाठिंबा आहे. काँग्रेसने हा मुद्दा संपूर्ण निवडणुकीत लावून धरला होता. मात्र, नकारात्मक प्रचाराला जनतेने नाकारले, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला असून, ४७७४ तालुका पंचायतीच्या जागांपैकी भाजपने तब्बल ३३५१ जागा, ३१ जिल्हा परिषदा, ८१ पैकी ७५ नगरपालिका, २३१ पैकी २०० तालुका पंचायतींमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवल्याचे प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.