जहांगीरपूरमधील MCD च्या कारवाईवरून राहुल गांधींसह सर्व विरोधी नेत्यांकडून भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 06:46 PM2022-04-20T18:46:40+5:302022-04-20T18:56:20+5:30
Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या संविधानावर हा बुलडोझर चालवत असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर एमसीडीने आज येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. यानंतर विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या संविधानावर हा बुलडोझर चालवत असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून जहांगीरपूरमध्ये हा बुलडोझर चालवला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा बुलडोझर देशाच्या संविधानावर चालवला जात आहे. देशातील गरीब अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे हा यामागील उद्देश आहे. भाजपने आपल्या मनात दडलेल्या द्वेषावरही बुलडोझर फिरवला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.
This is a demolition of India’s constitutional values.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2022
This is state-sponsored targeting of poor & minorities.
BJP must bulldoze the hatred in their hearts instead. pic.twitter.com/ucSJK9OD9g
अवैध अतिक्रमणाविरोधात बुलडोझर
आज, बुधवारी एमसीडीने जहांगीरपूरमध्ये अवैध अतिक्रमणाविरोधात बुलडोझर चालवला आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक लोकांनी घरे रिकामी करायला सुरुवात केली. तणावाच्या वातावरणात बुलडोझर चालवण्याची बेकायदेशीर कारवाई सुरू झाली. अर्ध्या तासानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतरही एमसीडीने कारवाई सुरूच ठेवल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.
राजकीय पक्षांकडून विरोध
दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि आमदार आतिशी यांनी भाजपच्या मुख्यालयावर हा बुलडोझर चालवावा, असे म्हटले आहे. तसेच, आम्ही लोकांना विभाजन करून ठेवत नाही. धर्म, जात, कर्माच्या आधारावर वेगळे होऊ नका. आपल्या नजरेत सगळे एक आहेत, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. तर काँग्रेसपासून समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, एआयएमआयएमने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.