जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 06:11 AM2023-05-14T06:11:32+5:302023-05-14T06:12:18+5:30

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

Jai Bajrangbali, Congress itself..., huge success in Karnataka after 34 years; The 'government with 40 percent commission' issue became effective | जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

googlenewsNext


बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १३६ जागा जिंकून भाजपचा दारूण पराभव केला तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत बजरंग दलावरील बंदीबाबतचा प्रचारात गाजलेला मुद्दा भाजपला तारू शकला नाही. ‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

बजरंगबलीचा नारा देऊन मतदान करावे व काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते; पण, त्या पक्षाला हनुमानाने तारले नाही. कर्नाटकच्या मतदारांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अधिक भावल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले. सलग एकाच पक्षाकडे सत्ता न सोपविण्याची कर्नाटकातील सुमारे ३८ वर्षे जुनी परंपरा या निवडणुकांतही कायम राहिली. कर्नाटकमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. भाजप जनतेच्या कल्याणासाठी यापुढे अधिक जोमाने काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

बजरंग दलाचा मुद्दा कुचकामी
बजरंग दल, पीएफआयसारख्या विद्वेष पसरविणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा विचार काँग्रेसने जाहीरनाम्यात व्यक्त केला होता. त्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व नेत्यांनी भांडवल करून प्रचारात काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. मात्र, बजरंग दलाचा हा मुद्दा अजिबात प्रभावी न ठरल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले.

हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकही गेले
गेल्या डिसेंबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. दक्षिण भारतात भाजपची सत्ता असलेले एकमेव राज्य त्या पक्षाला गमवावे लागले आहे. 

सीमावर्ती भागातही काँग्रेस -
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील बेळगाव,  विजयपूर, कलबुर्गी, बिदर आणि बागलकोट या पाच जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या निवडणुकीत चांगलाच जोर लावला, मात्र त्यांना फार काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत या भागातील मतदारांनी भाजपला नाकारले असून कॉंग्रेसने गतवर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 

-  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ११ विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसने मुसंडी मारली, तर भाजपला सात जागांवर समाधान मानावे लागले.  
-  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील ८ पैकी सहा जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली, तर भाजप आणि जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. 
-  बागलकोट : ‘एज्युकेशन हब’असलेल्या बागलकोट जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागा काँग्रेसने खिशात टाकल्या, भाजपला दोन जागी यश मिळाले. 
-  कलबुर्गी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन 
खरगे यांचे ‘होम ग्राउंड’असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यात ८ पैकी ६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. भाजप आणि जेडीएसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. 
-  बिदर : बिदरमधील ६ पैकी चार 
जागांवर भाजप, तर दोन ठिकाणी 
कॉंग्रेस विजयी झाला. जेडीएसला 
बिदर जिल्ह्यात एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

जय-पराजयाची कारणे

काँग्रेस -
-  राहुल यांच्या भारत जोडो यात्रेने जिंकली मने
-  ४० टक्के कमिशनवाले सरकार हा काँग्रेसने केलेला प्रभावी प्रचार
-  काँग्रेसने राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा दिला स्थानिक मुद्द्यांवर अधिक भर
-  नेहमीच प्रबळ असलेला प्रस्थापितविरोधी प्रवाह यावेळीही कामी आला

भाजप -
-  शिक्षणसंस्थांमधील हिजाबबंदी, ४ टक्के मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हे राजकीयदृष्ट्या भाजपला महागात पडले
-  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रभावी नसल्याची सातत्याने होत असलेली टीका
-  भाजपने तिकीट नाकारलेले जगदीश शेट्टर तसेच काही नेते पक्षातून बाहेर पडले. त्या घटनाही पराभवास कारणीभूत.
 

Web Title: Jai Bajrangbali, Congress itself..., huge success in Karnataka after 34 years; The 'government with 40 percent commission' issue became effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.