'स्पीड ब्रेकर येत राहतात, पण...', ममता बॅनर्जींच्या स्वबळाच्या घोषणेवर काँग्रेसची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:36 PM2024-01-24T15:36:54+5:302024-01-24T15:37:16+5:30
Jairam Ramesh on Nyay Yatra: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Jairam Ramesh Reply on Mamata Decision: सत्ताधारी NDA चा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. पण, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे INDIA आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, 'कधी स्पीड ब्रेकर येतात, कधी रेड सिग्नल येतात. पण याचा अर्थ असा नाही की, प्रवास थांबला पाहिजे. आम्ही हे सर्व अडथळे पार करणार. काल राहुल गांधींना हाच प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की, ममता बॅनर्जी आणि टीएमसीशिवाय आम्ही इंडिया आघाडीची कल्पना करू शकत नाही. ममतादेखील काल म्हणाल्या होत्या की, आम्ही भाजपचा पराभव करू. याच भावनेने आम्ही (काँग्रेस) बंगालमध्ये प्रवेश करत आहोत. मधला मार्ग नक्की सापडेल. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी निवडणूक लढवणार, त्यात सर्व पक्षांचे सहकार्य असेल.'
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'माझी काँग्रेस पक्षाशी जागा वाटपावार कोणतीही चर्चा झालेली नाही. मी नेहमीच म्हटले आहे की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि एकहाती भाजपचा पराभव करू. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उद्या, म्हणजेच 25 जानेवारी रोजी कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता काँग्रेसच्या यात्रेत ममता दाखल होणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.