गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडीत अडकलेले लोक संतापले; काँग्रेस कार्यकर्त्यांना चपलेने चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:09 PM2024-12-04T15:09:13+5:302024-12-04T15:10:02+5:30
तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने संतप्त झालेल्या लोकांनी काँग्रेस नेत्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आज संभलला जाण्यासाठी रवाना झाले होते. परंतु त्यांना यूपी सीमेवर पोलिसांनी रोखलं. त्यांचा ताफा पुढे जाऊ शकला नाही. खूप संघर्ष केल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांचा ताफा दिल्लीला परत पाठवण्यात आला, त्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला परतले. येथून राहुल आणि प्रियंका यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत गेले.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संभलला जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यूपी सीमेवर त्यांच्या ताफ्याला रोखण्यासाठी आधीच वाहतूक बंद करण्यात आली होती. प्रशासनाच्या या कठोरपणामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. काहींना त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही तर काहींना सुनावणीसाठी न्यायालयात जायचं होतं पण जाता आलं नाही. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने संतप्त झालेल्या लोकांनी काँग्रेस नेत्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली. संतालेल्या लोकांची काँग्रेस कार्यकर्त्यांशी झटापट झाली आणि काही कार्यकर्त्यांना चपलेही चोपलं.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने लोकांशी संवाद साधला तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं की, ते आपल्या मुलीला परीक्षेसाठी घेऊन जात होते. मात्र ते आता ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. नरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीची मेरठमध्ये परीक्षा आहे. मात्र दिल्ली-यूपी सीमेवर ट्रॅफिक जॅममध्ये ते अडकले आहेत. इथून बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर लोकांना त्रास का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला.
एका व्यक्तीने सांगितलं की, त्याला सुनावणीसाठी कोर्टात जायचं होतं, मात्र ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यामुळे कोर्टाच्या सुनावणीला ते पोहोचू शकले नाहीत. एक व्यक्तीला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जायचं होतं, मात्र ट्रॅफिक जॅममुळे तो वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकला नाही. एका तरुणाची दुपारी १२ वाजता ऑफिसमध्ये मिटींग होती, मात्र तो ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ऑफिसला पोहोचू शकला नाही. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.