'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 01:51 PM2024-09-22T13:51:11+5:302024-09-22T13:51:57+5:30

Jammu-Kashmir Election 2024 : 'कलम 370 हटवल्यामुळेच आज जम्मू-काश्मीरमध्ये आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे.'

Jammu-Kashmir Election 2024 'will answer a bullet with a bullet; Article 370 will never be withdrawn', Amit Shah roared | 'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

Jammu-Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. एकीकडे काँग्रेस आणि नॅशनल कॉनफ्रन्स कलम 370 परत आणण्याचे आश्वासन देत आहेत, तर दुसरीकडे भाजप त्यांच्यावर याच मुद्द्यावरुन टीका करत आहेत. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी नौशेरा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

कलम 370 कधीच परतणार नाही
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर टीका करताना शाह म्हणतात, जम्मू-काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार कधीच स्थापन होणार नाही. काँग्रेसने जम्मू-काश्मीरचे अधिकार हिरावून घेतले. काश्मीरच्या जनतेला 70 वर्षे त्यांचे हक्क मिळाले नाहीत. आज विरोधक कलम 370 परत आणण्याचे आश्वासन देत आहेत. पण, ही कलम हटवल्यामुळेच आज राज्यात आपला तिरंगा अभिमानाने फडकत आहे. तर, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला त्यांच्या वेगळा झेंडा परत आणायचा आहे. त्यांना सांगू इच्छितो की, आता काश्मीरमध्ये फक्त आपला लाडका तिरंगाच फडकेल. 

दहशतवाद संपल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा 
जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपेपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा करणार नाही. दहशतवाद संपल्यानंतरच पाकिस्तानशी चर्चा होईल. विरोधकांना नियंत्रण रेषेवरील व्यापार पूर्ववत करुन दगडफेक करणाऱ्यांना वाचवायचे आहे. पण, जम्मू-काश्मीरमध्ये कोणताही दहशतवादी मुक्तपणे फिरकणार नाही, याची मी खात्री देतो. राज्यात 30 वर्षांपासून दहशतवाद सुरू आहे. 30 वर्षांत 3 हजार दिवस कर्फ्यू होता, तर 40 हजार लोक मारले गेले. मोदीजी आले अन् आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल. मोदी सरकारने दहशतवादाला जमिनीत गाडले, अशी गर्जना शाह यांनी यावेळी केली.

आरक्षण संपू देणार नाही
शाह पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने पहाडी, गुर्जर बकरवाल, दलित, वाल्मिकी आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाचा पुनर्विचार करू, असे म्हटले आहे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात. पण, आम्ही तुम्हाला आरक्षण काढू देणार नाही. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने 70 वर्षांपासून पहारी बांधवांचा आरक्षणाचा अधिकार हिरावून घेतला होता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

Web Title: Jammu-Kashmir Election 2024 'will answer a bullet with a bullet; Article 370 will never be withdrawn', Amit Shah roared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.