Jharkhand Election: राहुल-प्रियंकाकडून मोदी-शहांची बरोबरी; झारखंडमधील चकित करणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:53 AM2019-12-24T09:53:20+5:302019-12-24T09:54:13+5:30
मोदी-शहांनी संपूर्ण ताकद लावूनही भाजपाचा झारखंडमध्ये पराभव
रांची: झारखंड विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. मात्र तरीही भाजपालाझारखंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हिंदी भाषिक पट्ट्यातलं आणखी एक राज्य गमावण्याची नामुष्की भाजपावर ओढवली. झारखंडमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी मोदी-शहांनी सभांचा धडाका लावला होता. त्याठिकाणी नेमकं काय झालं, याची आकडेवारी मोठी रंजक आहे.
झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं. या पाचही टप्प्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या. मोदींनी एकूण ९ सभांना संबोधित केलं. तर गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मतदानाच्या तीन टप्प्यांमध्ये सभा घेतल्या. झारखंडमध्ये विधानसभेचे एकूण ८१ मतदारसंघ आहेत. मोदी आणि शहांनी प्रत्येकी ९ सभा घेत ६० मतदारसंघांमध्ये प्रचार केला. मात्र यातील ४० जागांवर भाजपाचा पराभव झाला. याचा अर्थ मोदी-शहांच्या सभांमुळे भाजपाला ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या.
महाराष्ट्रात निवडणुकीनंतर शिवसेनेच्या सोबत जाणाऱ्या काँग्रेसनं झारखंडमध्ये निवडणुकीआधीच झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केली. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. भाजपाला सत्तेपासून दूर राखण्यात काँग्रेसला यश आलं. झारखंडमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांनी ६ सभा घेतल्या. जवळपास २४ मतदारसंघांमध्ये त्यांनी प्रचार केला. यातील ८ जागा त्यांनी जिंकल्या. याचा अर्थ मोदी-शहांप्रमाणेच राहुल आणि प्रियंका यांनादेखील ३३.३३ टक्केच जागा जिंकता आल्या.