महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:18 PM2024-11-09T19:18:57+5:302024-11-09T19:19:57+5:30
आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष विविध प्रकारच्या आश्वासनांची खैरात वाटताना दिसत आहेत. आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले, ““ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि INDI आघाडी आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएस आहे. एका बाजूला प्रेम आणि एकता आहे, तर दुसऱ्या बाजूला द्वेष, हिंसा, क्रोध आणि अहंकार आहे. आम्ही म्हणतो, संविधान वाचवायचे आहे, कारण ते भारताचे आहे, ते जनतेचे रक्षण करते आणि भाजपला संविधान नष्ट करायचे आहे.”
राहुल म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांमुळे भारतात सर्वाधिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपले किती कर्ज माफ केले? पण त्यांनी अदानी-अंबानी सारख्या 25 लोकांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. आम्ही ठरवले आहे की, हे जेवढा पैसा माफ करतात, तेवढा पैसा आम्ही जनतेला देऊ.”
‘दर महिन्याला मिळतील 2500 रुपये खटाखट-खटाखट’ -
राहुल गांधी म्हणाले, “झारखंडमधील प्रत्येक महिलेला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 2500 रुपये मिळतील. खटाखट-खटाखट मिळतील. गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळेल, दर महिन्याला 7 किलो रेशन मिळेल. कोणतेही महागडे ऑपरेशन करायचे असो 15 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार. शेतकऱ्यांना धानासाठी प्रतिक्विंटल 3200 रुपये मिळतील. गरिबांच्या खात्यात पैसे टाकण्याची आणची इच्छा आहे.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी महाराषट्रात, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये आणि महिला व मुलींना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले आहे. याशिवया इतरही काही आश्वासने राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली आहेत.