'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 09:27 IST2023-06-06T08:55:03+5:302023-06-06T09:27:13+5:30
मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

'प्रेमाचे दुकान नसून द्वेषाचा मेगामॉल उघडला'; भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा राहुल गांधींवर निशाणा
'भारत जेव्हा जेव्हा नवे विक्रम प्रस्थापित करतो तेव्हा काँग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी भारताचा अभिमान पचवू शकत नाहीत. एकीकडे ते सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करतात, हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याची चर्चा करतात आणि दुसरीकडे आम्ही प्रेमाचे दुकान चालवत आहोत, असे सांगतात. अहो, तुम्ही द्वेषाचा मेगा शॉपिंग मॉल उघडला आहात, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षांच्या कामगिरीवरील एका पुस्तकाचे प्रकाशन केलं. यावेळी ते बोलत होते.
जेपी नड्डा म्हणाले,'२०१४ पूर्वीचा काळ आणि २०१४ नंतरचा काळ यात खूप फरक आहे. काहीही बदलणार नाही आणि सर्वत्र भ्रष्टाचार होईल, असा लोकांचा विश्वास होता, आम्ही सुधारणार नाही, ही देशाची मानसिकता बनली होती. आपल्या देशाची गणना भ्रष्ट देशांत होत असे. नेतृत्व, हेतू किंवा धोरण नव्हते. लोकांनी भाजपला मतदान केले आणि २०१४ मध्ये भारताला एक नेतृत्व मिळाले जे भारताला पुढे नेत आहे, असंही जेपी नड्डा म्हणाले.
"एकीकडे विकासाचे नवे विक्रम केले आहेत तर दुसरीकडे वारसा जपला आहे. केदारनाथ ते काशी विश्वनाथ धामपर्यंत नूतनीकरण करण्यात आले. शंकराचार्यजींच्या समाधीची पुनर्बांधणी करण्यात आली आणि प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी करण्यात आली,असंही जेपी नड्डा म्हणाले.
जेपी नड्डा म्हणाले, एक वेळ अशी होती जेव्हा भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी देशाच्या सीमावर्ती गावांमध्ये रस्ते न बांधणे ही देशाची रणनीती असल्याचे सांगितले होते. उलट आज भारताच्या सीमावर्ती गावांचा विकास होत आहे. तेथे रस्ते जोडणी मजबूत केली जात आहेत. 'आर्थिक दृष्टिकोनातून आज भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. ऋषी सुनक म्हणतात, तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असंही जेपी नड्डा म्हणाले.