'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:06 PM2024-09-16T21:06:45+5:302024-09-16T21:07:20+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन परतले आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरून सोमवारी मायदेशी परतले. नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी परदेशातून मोदी सरकारवर टीका केल्यामुळे, त्यांचा हा दौराही खूप चर्चेत राहिला. दरम्यान, आता राहुल गांधींच्या यौ दौऱ्यावर भाजपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पुन्हा राहुल गांधींच्या अमेरिकन दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. अमित मालवीय यांनी सोमवारी ट्विटरवर लिहिले की, राहुल गांधी त्यांच्या नवव्या परदेश दौऱ्यावरुनर मायदेशी परतले आहेत. त्यांनी 10 दिवस परदेशात घालवले. सार्वजनिक कार्यक्रमात ते फक्त पाच तास सहभागी झाले, मग इतके दिवस त्यांनी तिथे काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी काय करत होते?
ते पुढे म्हणतात, राहुल गांधी यांनी 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत माहिती दिली होती. (टेक्सास विद्यापीठ आणि भारतीय डायस्पोरा यांच्या भेटी, एकूण 1.5 तास). 10 सप्टेंबर रोजी (जॉर्जटाऊन विद्यापीठ, भारतीय डायस्पोरा, एक पत्रकार परिषद आणि निवडक अमेरिकन खासदारांशी संवाद, एकूण 3.5 तास ) वेळ घालवला. हे पाच तास सोडले, तर विरोधी पक्षनेते परदेशी भूमीवर काय करत होते, हे कोणालाच माहीत नाही.
11 ते 15 सप्टेंबर दरम्यान कुठे होते?
अमित मालवीय यांनी शेवटी लिहिले की, 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान ते कुठे होते? ते कोणाला भेटले? त्यांचे स्वागत कोणी केले? या संशयास्पद, गुप्त परदेश दौरे अनेक प्रश्न निर्माण करतात. यासोबतच त्यांनी काँग्रेस पक्षाकडे राहुल गांधींच्या अमेरिकन दौऱ्याबाबतचा संपूर्ण कार्यक्रम उघड करण्याची मागणी केली. दरम्यान, यापूर्वीही अमित मालवीय यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर अमेरिकेच्या भारतविरोधी खासदार इल्हान उमरची भेट घेतल्याबद्दल टीका केली होती.