राज्यसभा उमेदवारीसाठीच ज्योतिरादित्य अस्वस्थ, महत्त्व घटण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:16 AM2019-11-27T04:16:08+5:302019-11-27T04:18:33+5:30
राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी आपल्या टिष्ट्वटर खात्यातील स्वपरिचयातून काँग्रेस पक्षाचे नाव वगळल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित असतील तर त्यांचे स्वागत करण्यास तो पक्ष उत्सुक आहे.
राज्यसभेच्या मध्य प्रदेशमधील तीन जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेमध्ये काँग्रेसचे ११५ आमदार असून ते राज्यसभेवर आपला एक उमेदवार सहजी निवडून आणू शकतात. भाजपकडेही १०७ आमदार असून तेही एक जागा विनासायास जिंकणार आहेत. प्रश्न आहे तो फक्त तिसऱ्या जागेचा. ती जागा काँग्रेस किंवा भाजप यापैकी कोण जिंकणार हे त्यावेळच्या परिस्थितीवरच अवलंबून राहिल. दिग्विजयसिंह यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत एप्रिलमध्ये संपत असून त्यांना पुन्हा उमेदवारी हवी आहे. त्यांच्या मार्गात आडवे येणे कमलनाथ यांना परवडणारे नाही. ही जागा वगळता अन्य दोन जागांवरील उमेदवार निवडताना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य पातळीवरील नेत्यांनीच घ्यावा असेही सांगितले जाईल.
भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, ज्योतिरादित्य सिंदिया यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र तशी शिफारस मध्य प्रदेश भाजपकडून करण्यात आलेली नाही. ज्योतिरादित्य यांच्या नातेवाईक वसुंधराराजे शिंदे, यशोधराराजे सिंदिया या भाजपमध्येच आहे याचीही आठवण या नेत्याने करून दिली.
एकटे पडण्याची भीती
आपल्याला राज्यसभेची उमेदवारी कदाचित मिळणार नाही व मध्यप्रदेशमध्ये राज्यपातळीवरही फारशी मोठी जबाबदारी हाती नसेल या विचाराने ज्योतिरादित्य अस्वस्थ आहेत.
राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या स्तरावर ज्योतिरादित्यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे आपण एकटे पडतो आहोत की काय, या भावनेने त्यांना ग्रासले आहे.