ज्योतिरादित्य सिंधियांना काँग्रेस सोडण्याचा सल्ला; समर्थकांकडून पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:45 AM2020-02-22T10:45:09+5:302020-02-22T10:47:05+5:30
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशात सत्तेत असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत कलह थांबण्याचे नाव घेत नाही. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने मध्यप्रदेशचे राजकारण तापले आहे. त्यात आता सिंधिया यांना पक्ष सोडण्याचा सल्ला त्यांच्या समर्थकांनी पोस्टरच्या माध्यातून दिला आहे.
एका समर्थकाने पोस्टरच्या माध्यमातून सिंधिया यांना काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला. तर दुसऱ्या समर्थकाने राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका केली. कमलनाथ यांना एक व्यक्ती एक पद हा फॉर्म्युला का आठवत नाही, असा सवाल सिंधिया समर्थकाने उपस्थित केला आहे.
मध्य प्रदेशात कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे तीन दिग्गज नेते आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान आहे. तर दिग्विजय सिंह पडद्यामागून सरकारमध्ये सामील आहेत. मात्र सिंधिया यांच्या हाती काहीही आले नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे सिंधिया यांचे समर्थक नाराश झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून काँग्रेस संघटन आणि सरकारविरुद्ध पोस्टरबाजी करण्यात येत आहे.
ग्वालियर येथील महिला नेत्या रुचा ठाकूर यांनी सिंधिया यांना नवीन पक्ष स्थापन कऱण्याचा सल्ला सोशल मीडियावरून दिला होता. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील दिवंगत माधवराव सिंधिया यांनी उगवता सूर्य या चिन्हावर ज्या पक्षाकडून निवडणूक लढवली होती त्याच पक्षाला पुनर्जिवीत कऱण्याचा सल्ला समर्थकाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान नवीन पक्ष स्थापन करण्याचा सल्ला देणाऱ्या नेत्या रिचा ठाकूर यांना सिंधिया यांनी फटकारल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यानंतर ते पोस्टर सोशल मीडियावरून हटविण्यात आले आहे. यावरून आपल्या रक्तात काँग्रेच असल्याचा संदेश सिंधिया यांनी दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.