हॅलो, मी ज्योतिरादित्य शिंदे बोलतोय!; निवडणूक चिंतेमुळे राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 08:16 PM2020-04-28T20:16:20+5:302020-04-28T20:17:52+5:30
देशावर कोरोनाचे ढग दाटू लागलेले असताना मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले होते. यावरून भाजपावर टीका थांबत नाही तोच शिंदे यांच्या निमित्ताने पुन्हा वातावरण तापू लागले आहे.
इंदौर : नुकतेच भाजपामध्ये डेरेदाखल झालेल्या काँग्रेसचे मध्यप्रदेशमधील माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोना व्हायरसच्या संकटकाळातही निवडणुकीची चिंता सतावू लागली आहे. एकीकडे राज्य सरकार महामारीवर नियंत्रण मिळविण्यामध्ये व्यस्त असताना शिंदे कार्यकर्त्यांना फोन करून निवडणुकीमध्ये मदत मागत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून काँग्रेसलाही मोठी संधी मिळाली आहे.
देशावर कोरोनाचे ढग दाटू लागलेले असताना मध्य प्रदेशमध्ये सत्तांतराचे वारे वाहू लागले होते. यावरून भाजपावर टीका थांबत नाही तोच शिंदे यांच्या निमित्ताने पुन्हा वातावरण तापू लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागांसाठी सहा महिन्यांच्या आत पोट निवडणूक होणार आहेत. यामुळे शिंदे यांनी समर्थक आमदारांना जिंकवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना फोन करून सूचना करण्यास सुरुवात केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांवेरचा समर्थक सुधीरला फोन करून, ''मी शिंदे बोलतोय. पोटनिवडणुकीचा तयारी चांगल्या प्रकारे करा. घरातही सर्वांना सांग माझा फोन आला होता.'', असे सांगितले. याची खबर काँग्रेसला लागल्यानंतर सत्ता गेलेल्याच्या दु:खात शिंदे यांच्यावर टीका करण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. सांवेरमधून शिंदे यांचे जवळचे आणि शिवराजसिंहांच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळालेले तुलसी सिलावट हे निवडून आले होते. ते कमलनाथ सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. आता मंत्रीपद टिकवण्यासाठी सिलावट यांचे पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे.
शिंदे यांच्या फोनाफोनीनंतर काँग्रेसने टीका करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मीडिया प्रभारी नरेंद्र सलुजा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ही वेळ कोरोना महामारीशी लढण्याची आहे. मात्र, शिंदे लोकांना फोन करून निवडणुकीत जिंकवून देण्याचे सांगत आहेत. अशा वातावरणात राजकारण करणे योग्य नाही. यावरूनच समजते आहे की, शिंदे कोणत्या प्रकारचे नेते आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या वाचा...
CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार
प्लाझ्मा थेरपी कोरोनावरचा उपचार नाही, आवरा; केंद्राचा राज्यांना इशारा
आनंद महिंद्रांवर आली 'ते' ट्विट डिलीट करण्याची वेळ; नम्रतेने माफीही मागितली