ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आक्रमक, नवी पार्टी बनवण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:05 PM2020-02-22T15:05:28+5:302020-02-22T15:10:42+5:30
मध्य प्रदेशातली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
भोपाळ- मध्य प्रदेशातलीकाँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आता भोपाळमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवपुरीत ज्योतिरादित्य शिंदेच्या समर्थकानं शहरात मोठा पोस्टर लावला आहे. यात कमलनाथ, शिंदे यांची राहुल गांधींबरोबरचा फोटो छापण्यात आला आहे. पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री या छायाचित्राची मर्यादा विसरलेले आहेत. ज्योतिरादित्य शिंदेंना जे सांगितलं त्यावर विचार करायला हवा. लोकशाहीत स्वतःचं मत मांडल्यानंतर पक्ष मजबूत होतो. एका पदावर एका व्यक्तीचा फॉर्म्युला मध्य प्रदेश सरकारला का नाही आठवत?.
तसेच दुसऱ्या एका समर्थकानं शिंदेंना काँग्रेस पक्ष सोडून नवा पक्ष बनवण्याचा सल्ला दिला आहे. ग्वाल्हेरच्या एका महिला काँग्रेस कार्यकर्त्या रची ठाकूर यांनी शिंदेंना सार्वजनिकरीत्या दुसऱ्यांदा पक्ष बनवण्याचा सल्ला दिला आहे. शिंदेंचे वडील स्व. माधवराव शिंदेंनी ज्या प्रकारे सूरज निवडणूक चिन्हावरून निवडणूक लढली होती, त्या महिला पदाधिकाऱ्यानं ते पुनर्जीवित करण्याचा सल्ला दिला आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि शिंदे हे ताकदवान नेते आहेत. कमलनाथ मुख्यमंत्री आहेत, तर दिग्विजय सिंह पडद्यामागून सूत्रं हलवत आहेत. शिंदेच असे आहेत त्यांच्या हातात काहीही नाही.
नवा पक्ष बनवण्याचा सल्ला देणाऱ्या कार्यकर्त्याला ज्योतिरादित्य शिंदेंनी फटकारलं आहे. शिंदेंनी संघटनेलाही त्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. रची ठाकूरविरोधातही काँग्रेसकडून कडक कारवाई करण्यात येऊ शकते. पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही शिंदेंनी खडे बोल सुनावले असून, ते पोस्टर आता हटवण्यात आले आहेत.