ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 08:38 PM2020-03-09T20:38:25+5:302020-03-09T20:45:22+5:30

Jyotiraditya scindia : ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे.

Jyotiraditya scindia in touch with BJP leaders? | ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसला घोर, दिल्ली, भोपाळमध्ये बैठकांना जोर

Next

नवी दिल्ली - मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांसह काँग्रेसच्या एकूण १७ आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. हे मंत्री आणि आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटातील असून, स्वत: शिंदेही बंडाच्या पावित्र्यात असून, त्यांनी भाजपाच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शिंदे यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच राज्यात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे एकूण तीन गट आहेत. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना आपापल्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर टीका केली होती. तसेच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिला होता. तेव्हा कमलनाथ यांनीही ज्यांना रस्त्यावर उतरायचे आहे त्यांनी उतरावे असे आव्हान दिले होते.

आता ज्योतिरादित्य शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसकडून त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याची ऑफर आली आहे. मात्र शिंदे यांनी ही ऑफर धुडकावून लावली आहे. आता ज्योतिरादित्य शिंदे हे आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यावेळी अमित शाह हेसुद्धा उपस्थित असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील १७ आमदारांनी आज बंडाचा पवित्रा घेत कर्नाटक गाठले आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील ६ मंत्र्यांचाही समावेश आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार इमरती देवी, प्रद्युम्न सिंह तोमर, महेंद्र सिंह सिसोदिया, तुलसी सिलावट, प्रभुराम चौधरी आणि गोविंद सिंह राजपूत हे आमदार कर्नाटकात पोहोचल्याचे वृत्त आहे.  

दुसरीकडे काँग्रेसमधील घडामोडींवर भाजपा बारीक लक्ष ठेवून आहे. भाजपाने आपल्या सर्व आमदारांना तातडीने भोपाळमध्ये बोलावले आहे. दरम्यान, कर्नाटक गाठलेल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्रावर सोपवण्यात आली आहे.

Web Title: Jyotiraditya scindia in touch with BJP leaders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.