ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपकडून राज्यसभेसह मिळणार कॅबिनेटमध्ये स्थान ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:11 AM2020-03-11T10:11:22+5:302020-03-11T10:11:36+5:30
ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिवंगत काँग्रेस नेते आणि पिता माधवराव शिंदे यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
नवी दिल्ली - काँग्रेसनेतेज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून देखील शिंदे यांना राज्यसभा आणि कॅबिनेटमंत्रीपद देण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षविरोधी कारवाया करण्याच्या कारणावरून पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसला अलविदा करणारे 49 वर्षीय ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आजी दिवंगत विजयाराजे शिंदे भाजपच्या संस्थापक सदस्य होत्या. मंगळवारी संपूर्ण देशात होळी साजरी होत असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
दोन वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले होते की, आमच्या गळ्यावर तलवार ठेवली तरी आम्ही झुकणार नाही. मात्र आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात शिंदे यांनी म्हटले की, आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये राहून देशातील जनतेची सेवा करणे शक्य नाही.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिवंगत काँग्रेस नेते आणि पिता माधवराव शिंदे यांच्या जयंती दिनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्यासह काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. मध्यप्रदेशात 230 सदस्यीय विधानसभेत दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे 228 सदस्यांपैकी 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा सदस्य संख्या केवळ 206 वर येणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी 104 आमदार लागणार आहेत. तर काँग्रेसकडे केवळ 92 आमदार असणार आहेत. काँग्रेसला सध्या तरी सपा, बसपाच्या आमदारांचा पाठिंबा आहे.