ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:04 AM2020-03-11T01:04:48+5:302020-03-11T01:05:29+5:30

MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे.

Jyotiraditya uprising threatens Madhya Pradesh government; Members of SP-BSP also in BJP's tent | ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

Next

भोपाळ : काठावरचे बहुमत मिळवत साधारण सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिल्याने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने १९ आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सरकार अल्पमतात गेल्याने काय पावले उचलायची, यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्यावर कमलनाथ यांनी सरकारला धोका नसल्याचा दावा केला.

शिंदे लवकरच समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र त्यांचा राजीनामा न स्वीकारता काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. मोदी, शहा यांची भेट आणि काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर ‘हॅप्पी होली’ एवढीच प्रतिक्रिया देत ज्योतिरादित्य यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. त्यानंतर लागोपाठ घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींत बंगळुरू मुक्कामी असलेल्या त्यांच्या समर्थक आमदारांपैकी २२ जणांनी राजीनामे दिले. यात कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या ३० पर्यंत जाईल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. कमलनाथ भाजपचे आमदार फोडतील, या भीतीपोटी रात्री पक्षाने आपल्या सर्व आमदारांना दिल्लीत हलविले.

‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहून पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या शिंदे यांच्या गटातील इमरती देवी, तुळसी सिलावट, गोविंदसिंग राजपूत, महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युम्नसिंग तोमर आणि प्रभुराम चौधरी अशा सहा मंत्र्यांना त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

‘त्या’ आमदारांना पुन्हा संधी?
मध्य प्रदेशातील काँगे्रसचे सरकार पाडण्यापेक्षा ते अंतर्गत विरोधामुळे, त्या पक्षातील सत्तासंघर्ष आणि कुरघोडीमुळे कोसळले तर त्याचा ठपका भाजपवर येणार नाही, अशी खेळी भाजप नेत्यांनी खेळली. सध्या २२ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. त्यामुळे सभागृहात बहुमत सिद्ध न करता ते कोसळेल. सध्या राजीनामा दिलेल्या २२ आमदारांना कर्नाटकप्रमाणे पोटनिवडणुकीत पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
काँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट होताच मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार धुळवड साजरी केली. आता ‘दिवाळी लवकरच’ अशी प्रतिक्रियाही तेथील नेत्यांनी दिली. 

असे आहे सत्तेचे गणित...
मध्य प्रदेश विधानसभेतील सदस्यांची संख्या २३० आहे. त्यापैकी दोन आमदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २२८ आहे. काँग्रेसकडे ९४ आमदारांचे संख्याबळ होते. छोटे पक्ष- अपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर ती संख्या ११५ झाली आणि काँग्रेसने सहज बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतरही सहा आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे संख्याबळ १२१ वर पोहोचले. या राज्यात भाजपकडे १०७ आमदार होते.

सत्तास्थापनेसाठी त्यांना आठ आमदार कमी पडल्याने त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. आता काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्याने विधानसभेतील सदस्यांची संख्या २०६ होईल. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी १०५ आमदारांची गरज आहे. भाजपकडे स्वत:चे १०७ आमदार असल्याने राज्यपालांचे आमंत्रण मिळताच तो पक्ष विधानसभेत सहज बहुमत सिद्ध करू शकेल.

वडिलांचाच गिरवला कित्ता : ज्योतिरादित्य यांचे भाजपात स्वागत करत आत्या यशोधराराजे यांनी ही घरवापसी असल्याचे म्हटले. ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेस सोडून जनसंघाची कास धरली होती, तर वडील माधवराव शिंदे यांनीही काही काळ काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडताच त्यांचा मुलगा महाआर्यमान याने मला वडिलांचा अभिमान आहे, असे ट्विट केले आहे.

Web Title: Jyotiraditya uprising threatens Madhya Pradesh government; Members of SP-BSP also in BJP's tent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.