भाजपची फ्लोर टेस्टची मागणी, तर कमलनाथ यांना 10 वर्षे मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 04:44 PM2020-03-13T16:44:37+5:302020-03-13T16:45:57+5:30
राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले.
नवी दिल्ली - संकटात सापडलेल्या मध्यप्रदेश सरकारची फ्लोर टेस्ट अर्थात बहुमत चाचणी 16 मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांकडे बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या बहुमत चाचणीसाठी मुख्यमंत्री कमलनाथ तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे समर्थक मंत्री आणि आमदारांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. तेव्हापासून काँग्रेस सरकार अल्पमतात गेले आहे. मात्र तरी देखील कमलनाथ सरकार या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, 19 आमदार भाजपच्या ताब्यात आहेत. तसेच त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे फ्लोर टेस्ट होऊ शकत नाही. त्यांना खुद्द विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित राहावे लागेल. भाजपकडून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे कमलनाथ यांनी आपण सरकार वाचवू असं म्हटले आहे. तसेच पुढील 10 वर्षे मीच मुख्यमंत्री राहिल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यपालांना भेटून आपण आमदारांना कैद केले असल्याची माहिती दिली आहे. हे भाजपचे षडयंत्र असून आपण सरकार वाचविण्यात यशस्वी होऊ, असही कमलनाथ यांनी सांगितले.