Kamal Nath Resigns: मध्य प्रदेश: कमलनाथ यांचे विरोधी पक्षनेतेपदही गेले; तडकाफडकी राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:27 PM2022-04-28T17:27:38+5:302022-04-28T17:36:25+5:30
Kamal Nath Resigned: ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे सत्ता गमावलेल्या मध्यप्रदेशच्या कमलनाथांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये काय चाललेय असा प्रश्न प़डू लागला आहे.
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे. परंतू, दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यामुळे सत्ता गमावलेल्या मध्यप्रदेशच्या कमलनाथांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये काय चाललेय असा प्रश्न प़डू लागला आहे.
कमलनाथांच्या जागी आता गोविंद सिंह यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे. कमलनाथ हे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे राजीनामा देतील असा अंदाज लावला जात होता. अखेर त्यांनी आज काँग्रेस हायकमांडकडे राजीनामा सोपविला आहे. राजीनाम्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसांपासून कमलनाथांमुळे वाद सुरु झाले होते. विधानसभेतील कामकावर त्यांनी एक वक्तव्य केले होते, त्यावरूनही वाद सुरु होता. भाजपाच्या फालतू गोष्टी ऐकण्यासाठी मी विधानसभेत जात नाही, असे त्यांनी एका मुलाखतीवेळी म्हटले होते. यावर भाजपाने आक्षेप घेतला होता तसेच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
गोविंद सिंह हे सात वेळा आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र त्यांच्या नियुक्तीवर आतापासूनच राजकारण सुरू झाले आहे. भाजपने याला काँग्रेसचे राजकारण म्हटले आहे. एससी, एसटी किंवा ओबीसी प्रवर्गातून काँग्रेसने मुद्दामहून नेता दिला नसल्याचा आरोप केला आहे.