कमलनाथ काँग्रेसमध्येच राहणार, राहुल गांधींशी चर्चेनंतर घेतला निर्णय, मात्र नकुलनाथ...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:43 AM2024-02-19T11:43:36+5:302024-02-19T11:44:44+5:30
Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासून रंगल्याने भोपाळपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासून रंगल्याने भोपाळपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर कमलनाथ यांनी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांच्यासह काही काँग्रेस आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा आधीच फेटाळून लावल्या आहेत. मध्य प्रदेशमधील माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी रविवार १८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी चर्चा केली होती. कमलनाथ यांच्या निवासस्थानी ही चर्चा सुमारे अर्धा तास चालली होती. या भेटीनंतर सज्जन सिंह वर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, कमलनाथ यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. राहुल गांधी यांच्याशीही त्यांचं बोलणं झालं आहे. मी ४० वर्षांपासून त्यांच्यासोबत आहे. जिथे कमलनाथ असतील. तिथे मी असेन. कमलनाथ हे आज काँग्रेसमध्ये आहेत आणि उद्याही काँग्रेसमध्येच राहतील. मात्र परवा काय होईल माहिती नाही. प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्याबाबत आमच्या मनात कुठलीही नाराजी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सज्जन सिंह वर्मा यांनी सांगितले की, कमलनाथ यांचं लक्ष सध्या मध्य प्रदेशमधील लोकसभेच्या २९ जागांवर आहे. ते जातीय समिकरणं जुळवत आहेत. कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला नाही, याबाबत विचार करत आहेत, असेही सज्जन सिंह वर्मा यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी कमलनाथ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, कमलनाथ कुठेही जात नाही आहेत. काही लोकांनी प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतला. माझी कमलनाथ यांच्याशी चर्चा झाली आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या ह्या कुठल्यातरी कटकारस्थानाचा भाग आहेत. त्यानंतरच या चर्चांना सुरुवात झाली. ज्या व्यक्तीने पक्ष उभा केला. ज्याला इंदिरा गांधी तिसरा मुलगाा मानायच्या. तो काँग्रेस कसं काय सोडू शकतो, असा सवाल जितू पटवारी यांनी उपस्थित केला.