"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 07:19 PM2024-05-08T19:19:47+5:302024-05-08T19:20:28+5:30
पित्रोदा स्वत:च माणसासारखे कमी आणि पक्ष्यासारखे अधिक दिसतात, असेही कंगनाने म्हटले आहे...
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या दिसण्यावर केलेल्या वक्तव्यावरून जबरद्त गदारोळ सुरू आहे. यातच आता, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा अभिनेत्री कंगना रणौतनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाली, या विधानांवरून सहज स्पष्ट होते की, यांची संपूर्ण विचारधाराच फोडा आणि राज्य करा, अशी आहे. काँग्रेसला लाज वाटायला हवी. एढेच नाही तर, पित्रोदा स्वत:च माणसासारखे कमी आणि पक्ष्यासारखे अधिक दिसतात, असेही कंगनाने म्हटले आहे.
एक्स अकाउंटवर सॅम पित्रोदांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले, 'सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे मार्गदर्शक आहेत. भारतीयांबद्दलचा त्यांचा वर्णद्वेष आणि फुटीरतावाद ऐका. त्यांची संपूर्ण विचारधाराच फोडा आणि राज्य करा, अशी आहे. भारतीय लोकांना चिनी आणि आफ्रिकन म्हणणे घृणास्पद आहे. काँग्रेसला लाज वाटायला हवी.
याशिवाय इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन स्टोरी शेअर करत कंगनाने लिहिले, 'काँग्रेसचे अंकल सॅम म्हणतात की दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात, पूर्व/उत्तर-पूर्व भारतीय चायनी लोकांप्रमाणे दिसतात, गुजरात पट्ट्यातील लोक अरबांसारखे दिसतात आणि उत्तरेकडील लोक गोऱ्यांप्रमाणे दिसतात, मी विचार करत आहे की, अंकल सॅम भारताच्या कोणत्या भागाशी संबंधित आहेत, कारण ते माणसासारखे कमी आणि पक्ष्यासारखेच जास्त दिसतात.'
इंस्टाग्रामवरील दुसऱ्या स्टोरीत कंगना म्हणते, "कृष्णाला श्याम म्हटले जाई, श्याम म्हणजे काळा रंग. भगवान राम सर्वात गडद काळे होता, अर्जुन देखील काळा होता आणि द्रौपदी या सर्वांमध्ये सर्वात गडद होती, तरीही ती सर्वात सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. कृष्णाने तिला आपले नाव दिले होते, ते तिला तिच्या रंगामुळे नेहमी प्रेमाणे 'कृष्णा' म्हणत. या देशातील काळ्या रंगाचे लोक त्यांच्या पूर्वजांसारखे दिसतात, वर म्हटल्याप्रमाणे आफ्रिकन लोकांसारखे नाहीत. अर्जुनाने एका मणिपुरी महिलेसोबत लग्न केले, त्याने चित्रांगदा नावाच्या सनातन राजकन्येशी लग्न केले. चिनी लोकांप्रमाणे दिसणाऱ्या मुलीशी नाही. गुजरात आणि महाराष्ट्रातील लोक पूर्णपणे भारतीय दिसतात, त्याचप्रमाणे उत्तर भारतातील लोकही पूर्णपणे भारतीय दिसतात. केवळ तुमचा राजाबाबू इटालियन आहे, याचा अर्थ प्रत्येकाचे जीन मिश्रित आहेत असा नाही. आम्ही 100% शुद्ध देशी भारतीय आहोत.
Sam Pitroda is Rahul Gandhi’s mentor. Listen to his racist & divisive jibes for Indians.
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) May 8, 2024
Their whole ideology is about divide & rule. It's sickening to call fellow Indians Chinese and African.
Shame on Congress! pic.twitter.com/WDSYAuFbht
सॅम पित्रोदा नेमकं काय म्हणाले? -
ईशान्य भारतातील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय गोऱ्या लोकांप्रमाणे दिसतात. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे, तशीच ती आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या 75 वर्षांत प्रत्येकाला जगता येईल, असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. पण काही फरक पडत नाही. आपण सर्व बंधुभावाने राहतो," असे विधान सॅम पित्रोदा यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे.