अखेर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:54 PM2021-09-28T17:54:26+5:302021-09-28T19:55:15+5:30
मागील अनेक दिवसांपासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी या दोन युवा नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी केली आहे. दरम्यान, या प्रवेशापूर्वी शहीद भगतसिंग पार्कमध्ये कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासोबत उपस्थित राहुल गांधींनी विरोधकांना एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | CPI leader Kanhaiya Kumar and Gujarat MLA Jignesh Mewani meet Congress leader Rahul Gandhi at Shaheed-E-Azam Bhagat Singh Park, ITO, Delhi pic.twitter.com/gMhDJpbGH9
— ANI (@ANI) September 28, 2021
काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारला काँग्रेसच्या जवळ आणण्यात आमदार शकील अहमद खान यांनी सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. कन्हैयाशी त्यांचा चांगला संबंध आहे आणि त्यांनीच कन्हैया कुमारची राहुल गांधींशी भेट घालून दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या विरोधातील आंदोलनात शकील बिहारमध्ये कन्हैयासोबत फिरत होते.
CPI leader Kanhaiya Kumar and Gujarat MLA Jignesh Mewani joins Congress in the presence of Rahul Gandhi in New Delhi pic.twitter.com/7t0tf8lqmp
— ANI (@ANI) September 28, 2021
प्रशांत किशोर यांची महत्वाची भूमिका
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचाही या पक्षप्रवेशात महत्त्वाचा भाग असल्याची माहिती मिळत आहे. खरतर, प्रंशांत किशोर यांच्याच मार्गदर्शनाखाली राहुल गांधी युवा नेत्यांची नवीन टीम बनवत आहेत. त्यात कन्हैया आणि जिग्नेशची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये कन्हैया कुमारचा चांगला फायदा होऊ शकतो.
Kanhaiya Kumar is a symbol of the fight for freedom of expression in this country. He fought against fundamentalism as a student leader. The joining of kind of dynamic personality will fill the entire cadre of Congress with enthusiasm: Congress leader KC Venugopal in Delhi pic.twitter.com/RQWyTrOwZk
— ANI (@ANI) September 28, 2021
बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात होते
मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात होते. अलीकडेच कन्हैया कुमारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून उमेदवार न उभा करून काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेशला मदत केली होती.
काँग्रेस युवा टीम तयार करण्याच्या तयारीत
गेल्या दोन वर्षात अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियंका चतुर्वेदी यांची नावे यात समाविष्ट आहेत. कन्हैया आणि जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील झाल्यास, पक्ष त्यांचा वापर उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल प्रदेशात प्रचारासाठी करू शकतो. सपा-बसपाने स्पष्ट केलंय की, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाहीत, पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल. यामुळे काँग्रेसला आता नवीन चेहऱ्यांची प्रचारासाठी गरज आहे.
कन्हैयाने 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती
मूळचा बिहारचा असलेला कन्हैया जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर प्रकाशझोतात आला. त्याने बिहारमधील बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात भाकपचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्याचा पराभव झाला. दुसरीकडे, दलित समाजातील जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत.