पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय कोण घेत आहे ? काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 05:40 PM2021-09-29T17:40:53+5:302021-09-29T17:50:19+5:30
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नेतृत्वावरुन आपल्याच पक्षावर निशाणा साधलाय.
नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला आरसा दाखवला आहे.
'पक्षाला अध्यक्ष नसल्यामुळे ही वेळ'
कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वार टीका केली आहे. ते म्हणाले, 'पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिता जी पार्टी सोडून निघून गेल्या, फेलेरियो गले, सिंधिया गेले, केरळमध्ये सुधीरन गले, जितिन प्रसाद गेले, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते का सोडत आहेत ? आपलीच काहीतरी चूक होत असेल, ज्यामुळे अनेकजण पक्ष सोडत आहेत. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्यामुळे ही गळती होत आहे', असं सिब्बल म्हणाले.
I believe that one of my senior colleagues has perhaps written or is about to write to Congress president to immediately convene a CWC so that a dialogue can take place as to why we are in this state: Congress leader Kapil Sibal in Delhi pic.twitter.com/kKqQRw99di
— ANI (@ANI) September 29, 2021
'आम्ही किती काळ थांबायचं'
कपिल सिब्बल पुढे म्हणाले, 'मी फक्त एवढेच म्हणेन की प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याचा विचार करावा. ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनाही पक्षात परत आणले पाहिजे. आपल्याला मुक्त संवाद संभाषण आवश्यक आहे. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. आता किती दिवस थांबायचं ? पक्षाला नेतृत्व हवंय.'
'काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान'
सिब्बल म्हणाले, 'मी काँग्रेसच्या विरोधात वक्तव्य करत नाही, मी काँग्रेससोबतच आहे. पंजाबमध्ये घडणाऱ्या घटनांवर मी काहीच बोललो नाही. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. पण, जर हे असेच चालू राहिले, तर भविष्यात अवघड परिस्थिती येईल. काँग्रेसचं नुकसान म्हणजे देशाचा पाया कमकुवत होण्यासारखं आहे.'
'अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी'
यावेळी कपिलसिब्बल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी केली आहे. ते म्हणाले, 'मागच्या वर्षी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले, त्या नेत्यांच्या बाजुने मी बोलत आहे. तेव्हापासून आम्ही पक्ष हायकमांडच्या कारवाईची वाट पाहत आहोत. पक्षामध्ये अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीची निवडणूक असावी अशी आमची इच्छा आहे', असंही ते म्हणाले.