Karnataka Assembly Election: मला तुरुंगात टाका, मी घाबरणारा नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:41 AM2023-04-17T06:41:45+5:302023-04-17T06:42:51+5:30
Karnataka Assembly Election 2023: २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.
कोलार (कर्नाटक) : २९ मार्च रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, राज्याच्या पहिल्या दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. येथील ‘जय भारत’ जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले, अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेणारे सरकार आहे.
राहुल गांधी रविवारी कर्नाटकातील कोलारमध्ये बोलत होते. रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, मला संसदेतून अपात्र ठरविण्यात आले. त्यांना (केंद्र सरकार) वाटते की, ते मला काढून टाकून आणि धमक्या देऊन घाबरवतील. मी घाबरणारा नाही. मी उत्तर मिळेपर्यंत प्रश्न विचारत राहीन. तुम्ही मला अपात्र करा, तुरुंगात टाका, तुम्हाला वाट्टेल ते करा, मी घाबरणारा नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
कर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास व्यक्त करत गांधी म्हणाले की, सरकार स्थापन केल्यानंतर पक्षाच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आपली प्रमुख निवडणूक आश्वासने पूर्ण करेल.
काँग्रेस १३० जागा जिंकणार, दक्षिण प्रवेशाचे दरवाजे बंद
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी कर्नाटकमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचा दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला किमान १३० जागा मिळतील आणि भाजपला दक्षिण भारतात प्रवेशाचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला रामराम ठोकला.
काँग्रेसची ४ आश्वासने
nगृहज्योती : कुटुंबांना २०० युनिट मोफत वीज
nगृहलक्ष्मी : महिलांसाठी २ हजार रुपये प्रति महिना
nअन्न भाग्य : बीपीएल कुटुंबांना १० किलो तांदूळ प्रति महिना
nयुवा निधी : २ वर्षांसाठी पदवीधरांसाठी ३ हजार रु., डिप्लोमाधारकांसाठी १,५०० रुपये प्रति महिना