जो पक्ष तुमचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला फेअरवेल द्या- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 01:59 PM2018-05-06T13:59:46+5:302018-05-06T13:59:46+5:30
पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका
चित्रदुर्ग: कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवरील हल्ले वाढताना दिसताहेत. आज चित्रदुर्गमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसकडून स्थानिक वीरांचा नव्हे, तर सुलतानांचा सन्मान केला जातो, अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले. जो पक्ष गरिबांचं वेल्फेअर करत नाही, त्या पक्षाला जनतेनं फेअरवेल द्यावं, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं. 'काँग्रेसला दिल (मन), दलितांची नव्हे, तर केवळ डिलची (व्यवहार) चिंता आहे,' असा घणाघाती हल्ला मोदींनी चढवला.
'दलित आईच्या पोटी जन्माला आलेल्या थोर वीरांगना वीरा मरकडी यांना मी वंदन करतो. त्यांच्याकडून आपण शौर्य आणि साहस शिकायला हवं. मात्र देशात एक असा पक्ष आहे, जो राजकारणासाठी इतिहास आणि भावनांचा आदर करत नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. 'ज्यांची जयंती साजरी करायला हवी, त्यांची जयंती काँग्रेस पक्ष साजरी करत नाही. काँग्रेस पक्ष वीरा मरकडीला विसरला. मात्र मतांसाठी सुलतानांची जयंती बरोबर साजरी केली जाते. हा चित्रदुर्गमधील जनतेचा अपमान आहे,' अशी टीका मोदींनी केली.
काँग्रेसच्या नेत्यांना लोक त्यांच्या डीलमुळेदेखील ओळखतात, असंही मोदींनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं. 'काँग्रेस पक्ष ना दिलवाल्यांचा आहे, ना दलितांचा आहे, तो फक्त डिलवाल्यांचा आहे,' असा हल्लाबोल मोदींनी केला. यावेळी मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीका केली. 'इथले मुख्यमंत्री त्यांच्या सुटकेसमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊनच फिरतात. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप होताच, ते लगेच सही करुन सर्टिफिकेट देऊन टाकतात. काँग्रेस पक्ष तुमच्या वेल्फेयरचा विचार करत नसेल, तर त्यांना फेयरवेल देण्याची वेळ आलीय,' असं मोदी म्हणाले.