कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या; पर्यटन विभागाची 'कूल' ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 08:41 AM2018-05-16T08:41:33+5:302018-05-16T08:41:33+5:30
केरळ पर्यटन विभागाच्या ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, तो बहुमतापासून दूर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकात फोडाफोडीचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. घोडेबाजाराच्या या संभाव्य शक्यतेवर केरळच्या पर्यटन विभागानं मिश्किल शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. त्रिशंकू विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांनी केरळमधील सुंदर आणि सुरक्षित रिसॉर्ट्समध्ये यावं, असं ट्विट केरळच्या पर्यटन विभागानं केलं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.
कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी 112 जागांची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपाकडे 104 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 78 आणि जेडीएसकडे 78 जागा आहेत. काँग्रेसनं जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपानंही सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांची पळवापळवीदेखील होऊ शकते. अशा परिस्थितीत अनेकदा राजकीय पक्ष आमदारांना सुरक्षित स्थळी घेऊन जातात. हेच लक्षात घेऊन केरळच्या पर्यटन विभागानं नवनिर्वाचित आमदारांना 'कूल' ऑफर दिली आहे. 'कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीनंतर आमदारांनी देवभूमी असलेल्या केरळच्या सुरक्षित आणि सुंदर रिसॉर्ट्समध्ये यावं,' असं आमंत्रणच केरळच्या पर्यटन विभागानं दिलं. या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. अनेकांनी पर्यटन विभागाच्या कल्पकतेचं कौतुकही केलं. मात्र काही वेळातच हे ट्विट डिलीट करण्यात आलं.
काही महिन्यांपूर्वी अण्णाद्रमुकच्या 120 आमदारांना शशीकला चेन्नईच्या बाहेर घेऊन गेल्या होत्या. पनीरसेल्वम यांनी केलेल्या बंडाला इतर आमदारांची साथ मिळू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. याशिवाय गेल्याच वर्षी झालेल्या गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही आमदारांची फोडाफोड झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं अहमद पटेल यांची राज्यसभेची वाट खडतर झाली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना कर्नाटकमधील एका हॉटेलमध्ये नेलं होतं. या घटना लक्षात घेता कर्नाटकमध्येही आमदारांची फोडाफोड होऊ शकते. याच अनुषंगानं केरळच्या पर्यटन विभागानं आमदारांची पळवापळवी, घोडेबाजारावर भाष्य करणारं ट्विट केलं. या ट्विटला 10 हजारहून अधिक लाईक्स मिळाले. सहा हजारपेक्षा अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं.