Karnataka Election: 'कधी सद्दाम हुसैन तर कधी अमूल बेबीसारखा चेहरा', CM सरमा यांची राहुल गांधींवर वादग्रस्त टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:39 PM2023-05-07T20:39:32+5:302023-05-07T20:40:13+5:30
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त टीका केली आहे.
Karnataka Election: कर्नाटकमधील प्रचार सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर वादग्रस्त टीका केली आहे. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या गॅरेंटी योजनांवर निशाणा साधत ते म्हणाले की, काँग्रेस जिथे निवडणूक लढवते तिथे गॅरेंटी देते. काँग्रेस गॅरेंटी देते, पण स्वत: राहुल गांधींची गॅरेंटी कोण घेणार, असे सरमा म्हणाले.
काँग्रेसने गॅरेंटी घेतली असती तर देशाची ही अवस्था झाली नसती. राहुल गांधींची खिल्ली उडवत सीएम सरमा म्हणाले की, राहुल गांधींचा चेहरा कधी सद्दाम हुसेनसारखा दिसतो, तर कधी अमूल बेबीसारखा दिसतो. अमेठीमध्ये निवडणूक हरल्यानंतर त्यांनी थेट केरळ गाठले. जो स्वत:ची गॅरेंटी घेऊ शकत नाही, तो कर्नाटकचा काय गॅरेंटी देणार? अशी टीका त्यांनी यावेळी केली.
#WATCH | Congress said we guarantee the people of Karnataka. Firstly, tell me who will take Rahul Gandhi's guarantee? He lost elections in UP & went to Kerala. One day his face becomes like Saddam Hussein's & another day like Amul baby: Assam CM Himanta Biswa Sarma in Karnataka pic.twitter.com/DdcBd8QrTg
— ANI (@ANI) May 7, 2023
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला अनेक महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. याबाबत भाजपकडून काँग्रेसला सातत्याने घेरले जात आहे. या वक्तव्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी हिमंता बिस्वा सरमा यांचा डीएनए काँग्रेसचा डीएनए असल्याचे म्हटले आहे. डीके शिवकुमार म्हणाले आहेत की, सरमा यांचे रक्त काँग्रेसचे होते, आता ते रक्त बदलले आहे.
यानंतर हिमंत यांनी शिवकुमार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले. आपल्यातील रक्त आपल्या आई-वडिलांचे, आपल्या राज्याचे, आपल्या देशाचे आहे आणि त्याचा आपल्याला खूप अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यादरम्यान सरमा यांनी डीके शिवकुमार यांना विनंती केली की, त्यांचे आई-वडील, कर्नाटक आणि भारत माता यांच्याशी जोडलेल्या रक्ताचा त्यांनाही अभिमान असायला हवा.