भाजपा आणि संघ कौरवांप्रमाणे फक्त सत्तेसाठी लढतात- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 04:26 PM2018-03-18T16:26:06+5:302018-03-18T17:03:57+5:30
भाजपा आणि संघ हे कौरवांप्रमाणेच फक्त सत्तेसाठी लढत आहेत. याउलट काँग्रेस पक्ष हा सत्यासाठी लढत आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी पक्षाच्या महाविधेशनाच्या व्यासपीठावरून भाजपाविरोधी 'धर्मयुद्धा'चे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कौरवांशी करताना सांगितले की, अनेक शतकांपूर्वी कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरवांमध्ये मोठे युद्ध झाले होते. कौरव हे सामर्थ्यशाली व उन्मत्त होते. तर पांडव हे नम्र आणि सत्यासाठी लढणारे होते. भाजपा आणि संघ हे कौरवांप्रमाणेच फक्त सत्तेसाठी लढत आहेत. याउलट काँग्रेस पक्ष हा सत्यासाठी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
भाजपाच्या अध्यक्षपदी एखाद्या खुनी व्यक्तीला बसवले तर लोक ते एकवेळ स्वीकारतील. मात्र, हेच काँग्रेस पक्षाच्याबाबतीत घडल्यास ती बाब लोकांच्या पचनी पडणार नाही. कारण लोकांच्या मनात काँग्रेसविषयी खूप आदर आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. यावेळी राहुल यांनी अमित शहा यांच्यावर जळजळीत टीका केली. भाजपाच्या अध्यक्षपदी एखाद्या खुनी व्यक्तीला बसवले तर लोक ते एकवेळ स्वीकारतील, या त्यांच्या विधानाचा रोख भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या दिशेने होता. तसेच भाजपा हा एका संघटनेचा आवाज आहे, तर काँग्रेस देशाचा आवाज आहे. भाजपाला देशातील सर्व संस्था संपवायच्या आहेत. त्यांना देशाचे नियंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या एकाच संस्थेच्या हातात द्यायचे आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :-
- 2019 मध्ये काँग्रेस पक्ष नक्की निवडणूक जिंकणार
- काँग्रेसचा हात सर्वांचं रक्षण करेल
- मोदींना 2019ची भीती वाटतेय
- नोटाबंदीची चूक संपूर्ण जगाने दाखवून दिली, पण मोदींनी मान्य केली नाही
- चूक मान्य करण्याचा उदारपणा भाजपमध्ये नाही
- संघाला देशभरातील सर्व संस्था मोडित काढायच्या आहेत
- मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यावरुनही राहुल गांधींचा भाजपवर निशाणा
- देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही
- काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही
- नेता आणि कार्यकर्तामधील भिंत आम्ही तोडणार
- देशातील प्रत्येक धर्मातील तरुण आणि तरुणांच्या शक्तीशिवाय देश बदलणे शक्य नाही
- काँग्रेसनं कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही
- नेता आणि कार्यकर्तामधील भिंत आम्ही तोडणार
- देशातील तरुणांना रोजगार फक्त काँग्रेसच देऊ शकतो
- मोदी आडनाव भ्रष्टाचाराचं दुसरं नाव झालंय
- भाजप सत्तेसाठी काहीही करु शकतं, काँग्रेसचा जनतेसाठी काहीही करु शकतं
- तुम्ही देशातील तरुणांना विचारा, तुम्ही काय करता त्याचे उत्तर मिळेल
- गेल्या दहा वर्षात राजकारणात खूप काही शिकायला मिळाले
- गुजरात निवडणुकीत मी मंदिरामध्ये गेल्यामुळं माझ्याबद्दल चूकीचे वक्तव्य केलं, मी मंदिरासोबत गुरुद्वार, चर्चमध्येही जातो. आणि गुजरात निवडणुकीआधीही मी मंदिर आणि मस्जिदमध्ये गेलो आहे. तर आताच का प्रश्न उपस्थित केला
- काँग्रेस देशाचा आवाज, तर भाजप संघाचा आवाज
- एका हत्येच्या आरोपीला पक्षाचे अध्यक्ष बनवलं
- आम्हाला खरे बोलण्यापासून कोणीही आडवू शकत नाही
- भाजपाला सत्तेची नशा चढलेय, राहुल गांधींकडून कौरवांशी तुलना
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. सत्तेवर असलेल्या मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली असून, काश्मीरमधील परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे, असा आरोप मनमोहन सिंग यांनी केला. दिल्लीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या 84 व्या राष्ट्रीय महाअधिवेशनात ते बोलत होते.
मनमोहन सिंग म्हणाले, मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. जेव्हा मोदी प्रचार करत होते तेव्हा त्यांनी दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करून असे आश्वासन दिले होते. मात्र आतापर्यंत दोन लाख नोकऱ्यासुद्धा मिळालेल्या नाहीत." धुमसत असलेल्या काश्मीर प्रश्नावरूनही मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला घेरले."काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. तसेच अंतर्गत दहशतवादानेही डोके वर काढले आहे. ही गोष्ट नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची आहे. या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारला कोणताही तोडगा काढता आलेला नाही." यावेळी मनमोहन सिंग यांनी जम्मू काश्मीरशी संबंधित असलेल्या सर्व घटकांसोबत चर्चा करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
या जगात नोटाबंदीसारखी दुसरा खोटारडेपणा असू शकत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. रिझर्व्ह बँकेला अजूनही नोटाबंदीनंतर परत आलेल्या जुन्या नोटांची मोजदाद पूर्ण करता आलेली नाही. तुम्ही हे काम तिरूपती मंदिरातील हुंडीतील पैशांची मोजदाद करणाऱ्यांकडे द्या. ते तुमच्यापेक्षा कमी वेळात हे काम पूर्ण करतील, असा टोला यावेळी चिदंबरम यांनी लगावला. सध्याच्या आर्थिक प्रगतीची बीजे ही 1990 मध्ये राजीव गांधी यांनी रोवली होती. त्यांनी जागतिकीकरणासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची दारं खुली केली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ही प्रक्रिया आणखी गतिमान झाली. सध्या भाजपाकडून अनेक दावे केले जात असले तरी या नोंदी खरी परिस्थिती स्पष्ट करतात, असे चिदंबरम यांनी सांगितले.