भाजपचे 'ते' डावपेच वेळीच ओळखल्याने केजरीवालांचा सहज विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:48 AM2020-02-12T09:48:37+5:302020-02-12T09:50:30+5:30
मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नव्या राजकारणाचा जन्म झाला आहे. काम करणाऱ्यालाच मत मिळेल, असा स्पष्ट संदेश देत दिल्लीकरांनी देशातील राजकारणाला कलाटणी दिल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी डावपेचही तेवढेच महत्त्वाचे ठरतात. या डावपेचात केजरीवाल सरस ठरले. भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देणे काँग्रेसला जमलं नाही. मात्र केजरीवालांनी ते लिलया करून दाखवलं.
निवडणुकीच्या तयारीचे नियोजनात सध्याच्या घडीला भाजप सर्वोत्तम पक्ष मानला जातो. प्रवक्त्यांची फौज, या फौजेने माध्यमांशी काय बोलायचं, सर्व नेत्यांच्या तोंडात एकावेळी एकच मुद्दा कसा सुरू ठेवायचा याचे नियोजन भाजपकडून करण्यात येते. यात भाजपला माध्यमांची बऱ्यापैकी साथ मिळते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हे पाहायला मिळालेच. एवढं सगळ असताना देखील अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या बलाढ्य यंत्रणेला चकमा देण्यात यश मिळवलेच.
भाजपने आपल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या मदतीने याआधी काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सहज शह दिला आहे. राहुल गांधी यांनी मंदिरांत जाऊन सौम्य हिंदुत्व स्वीकारले पण भाजपने हा डाव हाणून पाडला. मात्र केजरीवालांनी याला योग्य पद्धतीने शह दिला. दिल्ली निवडणुकीत केजरीवालांना एका कार्यक्रमात हनुमान चालीसा येते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली. भाजपने यावर आगपाखड केली. त्यावर प्रत्युत्तर देताना कॅनॉट येथील हनुमानजींनी मला विजयाचा आशीर्वाद दिल्याचे सांगत केजरीवालांनी भाजपची बोलती बंद झाली.
या व्यतिरिक्त केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फारसं लक्ष्य केले नाही. तर काँग्रेसच्या रडारवर प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी हेच दिसायचे. केजरीवालांनी मोदींवर टीका करणे टाळले. तसेच शाहीन बाग सांभाळताना हनुमानजींचा आशीर्वाद मिळवला. या आघाड्यांवर भाजपचे नियोजन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मुसंडी मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपला दुहेरी संख्या देखील गाठता आली नाही. तर केजरीवालांनी भाजपच्या कचाट्यात न सापडता पक्षाला विजय मिळवून दिला.