“मोदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात असताना राहुल गांधी एका मंदिराबाहेर आंदोलन करत होते”: विजयन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 01:37 PM2024-02-26T13:37:03+5:302024-02-26T13:37:59+5:30
Kerala CM Pinarayi Vijayan Criticized Congress: एखादा नेता उद्या पक्षात असेल की नाही, याबाबत काँग्रेस नेतृत्व ठामपणे सांगू शकत नाही, असा खोचक टोला केरळच्या मुख्यमंत्र्यांनी लगावला.
Kerala CM Pinarayi Vijayan Criticized Congress: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एक महिन्याहून अधिक काळ लोटला. या महिन्याभरात सुमारे ६२ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतले. तर कोट्यवधींचे दान दिले. अद्यापही राम मंदिरावरून विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असलेले पाहायला मिळत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर टीका करताना राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही तिरकस शब्दांत भाष्य केले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, पक्षाने निमंत्रण नाकारले. काँग्रेसनेही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचे जाहीर केले होते. या घडामोडींना महिना उलटून गेल्यानंतर आता केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी राम मंदिर सोहळ्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला.
राहुल गांधी एका मंदिराबाहेर आंदोलन करत होते
कन्नूर येथील एका कार्यक्रमात बोलताना विजयन म्हणाले की, ज्या दिवशी पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत गेले होते. त्याच दिवशी काँग्रेस पक्षाचे सर्वांत मोठे नेते राहुल गांधी मंदिरासमोर आंदोलन करत होते. मंदिरात जाणे, प्रार्थना करणे, भजन-पूजन करणे ही वैयक्तिक निवड आहे. आमचा याला विरोध नाही. पण त्यांनी यात्रेसाठी निवडलेली तारीख, वेळ आणि त्यातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथेच खरी समस्या आहे, असे सांगत मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दरम्यान, एखादा नेता उद्या पक्षात असेल की नाही, याबाबत काँग्रेस नेतृत्व ठामपणे सांगू शकत नाही. आश्वस्त नाही. अनेक मुद्दे असे आहेत की जे महत्त्वाचे आहेत. काँग्रेस नेतृत्वाची तीच भूमिका आहे, जी पंडित नेहरू यांनी घेतली होती. काँग्रेसचा गड कमकुवत झाला आहे आणि हिंदुत्ववादी शक्तींनी याचा वापर करून घेतला, असे विजयन यांनी सांगितले.