केरळ काँग्रेसचे कार्यालय विक्रीसाठी ओएलएक्सवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:56 AM2018-06-11T04:56:13+5:302018-06-11T04:56:13+5:30
राज्यसभेची जागा पूर्वी राजकीय शत्रू असलेल्या पण आता मित्र बनलेल्या केरळ काँग्रेसला (मणी गट) ‘भेट’ दिल्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यालय ओएलएक्सवर ‘विक्री’साठी लावण्यात आले आहे.
थिरूवनंतपूरम - राज्यसभेची जागा पूर्वी राजकीय शत्रू असलेल्या पण आता मित्र बनलेल्या केरळ काँग्रेसला (मणी गट) ‘भेट’ दिल्यामुळे केरळ काँग्रेसमध्ये झालेल्या उलथापालथीनंतर केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यालय ओएलएक्सवर ‘विक्री’साठी लावण्यात आले आहे.
कोणा अनिश नावाच्या व्यक्तीने ओएलएक्स पोर्टलवर ही धाडसी जाहिरात टाकून येथील सस्थामंगलम भागातील इंदिरा भवनची किंमत त्याने दहा हजार रुपये सांगितली आहे.
या जाहिरातीत या भवनचे छायाचित्र व त्याचा आकार देऊन लगेच तेथे जाता येईल, असेही म्हटले आहे. केरळमध्ये काँग्रेस मित्रपक्षांचे जे लांगूलचालन करीत आहे त्याला टोमणा मारताना जाहिरातीत इच्छूक लोक इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) किंवा केरळ काँग्रेसशी (मणी गट) संपर्क साधू शकतात, असेही म्हटले. राज्यसभेची जागा केरळ काँग्रेससाठी (मणी गट) सोडून देण्याचा निर्णय झाल्यापासून केरळ काँग्रेसमध्ये काही दिवसांत उघडपणे मतभेद व्यक्त होत आहेत.
दोन वर्षांनंतर केरळ काँग्रेस (मणी गट) संयुक्त लोकशाही आघाडीत (यूडीएफ) परतला आहे. सध्या राज्यसभेतील ही जागा राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरीयन यांच्याकडे असून ते १ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. केरळ काँग्रेसने (मणी गट) पक्षाचे माजी प्रमुख के. एम. मणी यांचा मुलगा जोस के. मणी यांना राज्यसभा उपसभापतिपदासाठी मैदानात उतरवले आहे.