काँग्रेसमध्ये 'खरगे राज', २४ वर्षांनी पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:30 AM2022-10-20T05:30:14+5:302022-10-20T05:30:57+5:30
सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांनी घरी जाऊन केले अभिनंदन; राहुल म्हणाले सेनापती म्हणून काम करणार.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. १३७ वर्षांच्या इतिहासातील ही सहावी निवडणूक जिंकत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खरगेंच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतून फोन करून खरगे यांना शुभेच्छा दिल्या. खरगे यांच्यावर देशभरातील कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मतमोजणीनंतर जाहीर केले की, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ९,३८५ मतांपैकी खरगे यांना ७,८९७ आणि शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली, तर ४१६ मते अवैध ठरविण्यात आली. खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याचे मिस्त्री यांनी येथे एआयसीसी मुख्यालयात पत्रकार परिषदेत बुधवारी जाहीर केले. खरगेंविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढत असलेले शशी थरूर यांना केवळ १० टक्के मते मिळाली.
उत्तर प्रदेश, पंजाब आणि तेलंगणातील मतदानाशी संबंधित थरूर यांच्या टीमच्या तक्रारीवर बोलताना मिस्त्री म्हणाले की, आपण पत्राला प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देऊ. ते म्हणाले की, हे पत्र प्रेसमध्ये लीक व्हायला नको होते. थरूर यांच्या टीमने थेट निवडणूक प्राधिकरणाशी संपर्क साधायला हवा होता. ते म्हणाले की, पत्रातील मुद्द्याला काहीही आधार नाही. तक्रारीत तथ्य नाही. खरगे हे गेल्या २४ वर्षांतील पहिले गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष आहेत.
पक्षात कोणीही लहान किंवा मोठा नाही. संघटनेला मजबूत करण्यासाठी आपण काँग्रेसचे सच्चे सैनिक म्हणून काम करू. माझ्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता समान आहे. लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या फॅसिस्ट शक्तींशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.
मल्लिकार्जुन खरगे, नवनिर्वाचित अध्यक्ष
खरगे यांच्या विजयाबद्दल मी अभिनंदन करतो. पक्षाच्या प्रतिनिधींचा निर्णय अंतिम असतो आणि तो नम्रपणे मी स्वीकारतो. अशा पक्षाचे सदस्य होणे ही सौभाग्याची बाब आहे, जो पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आपला अध्यक्ष निवडण्याची परवानगी देतो. सोनिया गांधी यांनी एक चतुर्थांश शतकासाठी आणि निर्णायक काळात पक्षाचे नेतृत्व केले. त्यामुळे सोनिया गांधी यांचे पक्षावर परतफेड न करता येणारे ऋण आहेत. नेहरू आणि गांधी कुटुंबियाने काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
शशी थरूर, काँग्रेस नेते
अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन. काँग्रेसचे अध्यक्ष हे भारताच्या लोकशाही दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात. ही ऐतिहासिक जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज झालेल्या खरगे यांचा व्यापक अनुभव आणि वैचारिक कटिबद्धता पक्षासाठी खूप उपयोगी पडणार आहे.
राहुल गांधी, काँग्रेसचे नेते
कार्यकाळ फलदायी होवो
काँग्रेस अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा. त्यांचा कार्यकाळ फलदायी होवो.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रियांका गांधी यांचे ट्वीट
मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन. मला पूर्ण विश्वास आहे की, राजकीय कारकिर्दीत आपण तळागाळात जे काम केले आहे, त्याचा अनुभव पक्षाला मजबुती देईल. संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपल्या नेतृत्वात काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.
प्रियांका गांधी,
सरचिटणीस, काॅंग्रेस