किंगफिशर गांधी परिवाराच्या मालकीची होती का ?: भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 07:39 PM2018-09-13T19:39:47+5:302018-09-13T19:40:52+5:30
पूर्ण गांधी कुटुंबिय माल्ल्याच्या विमानातून बिझनेस क्लासमधून फुकट प्रवास करायचे.
नवी दिल्ली : विजय माल्ल्यासोबतच्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनधिकृत बैठकीवरून काँग्रेसने पुरावे दिले असताना भाजपने पलटवार केला आहे. किंगफिशर एयरलाईन्सला वाचविण्यासाठी काँग्रेसने आपल्या कार्यकाळात माल्ल्यासोबत सौदा केल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. किंगफिशची मालकी गांधी कुटुंबाकडे असल्याने ते माल्ल्याचा बचाव करत होते, असा आरोप पात्रा यांनी केला.
पात्रा यांनी एका हवाला ट्रेडरचा कबुलीजबाब यावेळी दिला. काँग्रेसच्या अध्यक्षांचे संबंध एका शेल कंपनीशी होते. राहूल गांधी यांनी किंगफिशरच्या बाबतीत माघार घेतली. कारण पूर्ण गांधी कुटुंबिय माल्ल्याच्या विमानातून बिझनेस क्लासमधून फुकट प्रवास करायचे. यावेळी पात्रा यांनी बँकेकडून कर्ज घेतल्याचे कागदपत्र दाखवत सांगितले की, चांगल्या सौद्याच्या नावावर गांधी यांनी किंगफिशर एअरलाईन्सची मदत केली होती.
तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीच 2010 मध्ये किंगफिशर एअरलाईन्सला दिलासा देण्यासाठी नियम शिथिल केले होते. मल्ल्याला गंभीरपणे घेऊ नये. कारण प्रत्येक गुन्हेगार त्याच्या बचावासाठी काही ना काही बोलत असतो. त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असे सांगितले.
तसेच काँग्रेसचे नेते पुनिया यांच्यावर काँग्रेस पक्षाने जेटली यांच्याविरोधात बोलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप गोयल यांनी केला. अडीज वर्षांनी ते यावर का बोलत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुनिया तेथे काय करत होते? पुनियापण मल्ल्या आणि जेटलींच्या चर्चेत सहभागी तर नव्हते ना, असा सवालही त्यांनी केला.