काँग्रेस सरकार अल्पमतात, जाणून घ्या मध्य प्रदेशमधील 'नंबर गेम'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 04:05 PM2020-03-10T16:05:12+5:302020-03-10T16:07:37+5:30
मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 20 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. त्यामुळे, मध्य प्रदेशमधील राजकारणाची नवी समिकरणं कशी? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. आकड्यांचा खेळ करुन भाजपा सत्ता स्थापन करणार करेल, असेच दिसून येतंय.
'शिंदे तो झाँकी है, सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है'
मध्य प्रदेशच्या विधानसभा सदस्यांची संख्या 230 आहे. त्यापैकी राज्यातील 2 आमदारांचे निधन झाल्याने ही संख्या 228 वर येऊन पोहोचली आहे. काँग्रेसकडे 114 आमदारांचे संख्याबळ असल्याने 115 आमदारांचे संख्याबळ देऊन काँग्रेसने बहुमत सहजच सिद्ध केलं. काँग्रेसला 6 आमदराचे समर्थन मिळाले, त्यामुळे काँग्रेस आघाडीची संख्या 121 वर पोहोचली होती. त्यावर, काँग्रेसने सरकार बनवले. तर, भाजपाकडे 107 आमदार होते. भाजपाला सत्तास्थापनेसाठी 8 आमदार कमी पडत होते. त्यामुळे भाजपाला विरोधी पक्षात जावे लागले.
राजीनाम्यानंतर
काँग्रेसच्या 20 आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा सदस्यांची संख्या 208 वर पोहोचली आहे. त्यामुळे, बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला 105 आमदारांची गरज आहे. तर, भाजपाकडे स्वत:चे 107 आमदार आहेत. त्यामुळे राज्यपालांचे आमंत्रण मिळताच, भाजपा मध्य प्रदेशमध्ये आपलं सरकार स्थापन करू शकते. त्यानंतर, सहजपणे विधानसभेत बहुमत सिद्ध केलं जाईल.
अपक्ष आमदारांचे समर्थन
सध्या राज्यातील 4 अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. मात्र, सत्तापरिवर्तन अटळ असल्याचे दिसून येताच, या चारही आमदरांचा भाजपाला पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे भाजापाचे संख्याबळ 111 होईल. त्यानंतर, सत्ता टिकविण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपाला 22 जागांपैकी केवळ 6 जागांवर विजय मिळवणं आवश्यक आहे. जर अपक्षांचे समर्थन भाजपाला मिळाले नाही, तर भाजपाला 10 जागांवर विजय मिळवावा लागेल.
जर काँग्रेसला सरकार स्थापन करायचे असेल तर, पोटनिवडणुकीत काँग्रेसला 22 पैकी 21 जागांवर विजय मिळवावा लागेल. मात्र, राजीनामा दिलेले आमदार भाजपाकडून निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, काँग्रेसला हा विजयी आकडा गाठणे अतिशय अवघड दिसून येतंय. काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन 96 वर पोहोचली आहे. जर अपक्ष आमदारांनी समर्थन दिले, तर काँग्रेसला 18 जागांवर विजय मिळवावा लागेल. दरम्यान, शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. तर, शिंदे तो झाँकी है, पायलट और देवरा अभी बाकी आहे, असे मेसेजही पाहायला मिळत आहेत.