'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 02:34 PM2023-07-15T14:34:47+5:302023-07-15T14:35:15+5:30
युरोपीय संसदेत मणिपूरच्या स्थितीबाबत ठराव आणल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होता. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'मणिपूरच्या परिस्थितीवर युरोपियन संसदेत चर्चा झाली आणि निषेधार्थ ठराव आणण्यात आला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर एक शब्दही उच्चारलेला नाहीच', अशी टीका राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर केली.
पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधींनी ट्विट करून म्हटलं की, 'मणिपूर जळलं आहे. युरोपीय संसदेत भारताच्या अंतर्गत विषयावर चर्चा झाली. यावर पंतप्रधान एक शब्दही बोलले नाहीत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला पाहुणे म्हणून हजेरी लावली. फ्रान्स सरकारने पंतप्रधानांना निमंत्रित केले होते.
युरोपियन युनियनच्या संसदेने गुरुवारी एक ठराव मंजूर केला. यामध्ये त्यांनी मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात भारतातील मानवाधिकारांच्या स्थितीबद्दल बोलले आणि आरोप केला की, भारतातील अल्पसंख्याक समुदायांबद्दल असहिष्णुतेमुळे सध्याची परिस्थिती कायम आहे. या प्रस्तावात मणिपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, जानेवारी १९७७ मध्ये येल विद्यापीठातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड नेल्सन यांनी द मून अँड द घेट्टो नावाचा एक अतिशय लोकप्रिय लेख प्रकाशित केला होता. ग्रॅज्युएट स्कूलमध्ये माझ्यासारख्या लोकांसाठी हे वाचन आवश्यक बनले. नेल्सन यांनी प्रश्न उपस्थित केला - असे का दिसते आहे की तांत्रिकदृष्ट्या गतिमान यूएस चंद्रावर मानवांना उतरविण्यास सक्षम आहे, पण घरातील, विशेषत: अंतर्गत शहरांमधील समस्या सोडविण्यास असमर्थ आहे.
'ही महत्त्वाची आणि विचार करण्याची बाब आहे, जी आमच्यासाठीही प्रासंगिक आहे. आपण चंद्रावर जाऊ शकतो, परंतु आपल्या लोकांच्या घरी ज्या मूलभूत समस्यांचा सामना करावा लागतो त्या हाताळण्यास आपण असमर्थ किंवा इच्छुक नाही, असंही ते म्हणाले.